दांडी येथील पर्यटन व्यवसायिकांनी पुन्हा छेडले साखळी उपोषण
मालवण (प्रतिनिधी)
मालवण दांडी किनारा ते सिंधुदुर्ग किल्ला अशा प्रवासी होडी वाहतुकीसाठी परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या पर्यटन व्यवसायिकांना मेरीटाईम बोर्डाकडून उद्देशपत्र न मिळाल्याने आज सायंकाळी या व्यवसायिकांनी मालवण बंदर विभाग कार्यालयाच्या पायरीवर बसून साखळी उपोषण छेडले. जोपर्यंत उद्देशपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार, असा इशारा उपस्थित पर्यटन व्यावसायिकांनी दिला.
मालवण दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिर किनारा ते सिंधुदुर्ग किल्ला अशा प्रवासी होडी वाहतुकीसाठी २०१६ मध्ये सौ. सुमेधा मेघनाद धुरी व विठ्ठल केळूसकर यांना मेरिटाईम बोर्डाने परवानगी दिली होती. मात्र २०२२ मध्ये बोटीत प्रवाशांना चढउतार करण्याच्या दृष्टीने सुरक्षिततेच्या कारणास्तव मेरीटाईम बोर्डाने वाहतुकीवर स्थगिती लावली. त्यानंतर त्याठिकाणी तरंगती जेटी उपलब्ध करून मिळावी यासाठी जानेवारी २०२३ मध्ये सुमेधा धुरी, विठ्ठल केळूसकर, यांच्यासह मीनल परब, महादेव कोयंडे, संतोष केळूसकर रुपेश प्रभू या सहा पर्यटन व्यवसायिकानी श्री देव दांडेश्वर मंदिर येथे सहा पर्यटन व्यवसायिकानी उपोषण केले होते. उपोषणानंतर डिसेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाकडून श्री देव दांडेश्वर मंदिर येथे समुद्र किनारी तरंगती जेटी बसवून देण्यात आली. त्याचे उद्घाटन जानेवारी २०२५ मध्ये आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. मात्र जेटी बसवून दोन महीने कालावधी झाला तरी दोन व्यवसायिकांवरील स्थगिती न उठल्याने तसेच परवानगीसाठी नवे अर्ज दाखल केलेल्या इतर चार व्यवसायिकांना उद्देशपत्र देण्यात न आल्याने या व्यवसायिकानी ३ मार्चला बंदर विभाग कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. त्यावेळी एका व्यवसायिकास तात्काळ परवानगी देण्यात आल्याने उपोषण स्थगित करून इतर पाच जणांची परवानगी १० मार्च पर्यंत न मिळाल्यास ११ मार्च पासून पुन्हा उपोषण करू असा इशारा व्यवसायिकानी दिला होता.
मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने या व्यवसायिकानी काल ११ रोजी पुन्हा उपोषण छेडले असता प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी आज संध्याकाळ पर्यंत वेळ द्यावी, असे व्यवसायिकांना सांगितल्याने व्यवसायिकानी संध्याकाळ पर्यंत वाट पाहिली. मात्र आज संध्याकाळ पर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने संध्याकाळी या व्यवसायिकानी मालवण बंदर विभाग कार्यालयाच्या पायरीवर बसून साखळी उपोषण छेडले. सौ. सुमेधा धुरी व विठ्ठल केळूसकर या दोन जणांची परवानगी पत्रे आलेली आहेत. मात्र इतर चार सहकारी संतोष केळुसकर, महादेव कोयंडे, सौ. मिनल परब, रूपेश प्रभू या चार जणांना दांडी ते सिंधुदुर्ग किल्ला मार्गावर नौका चालविण्यासाठी लागणारे उद्देशपत्र आम्हाला अद्याप पर्यंत मिळालेली नाहीत, उद्देशपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असा इशारा यावेळी व्यवसायिकानी दिला. यावेळी मनसेचे मालवण शहराध्यक्ष सागर जाधव यांनी या उपोषणास पाठिंबा दिला.