कोकणात पर्यटन बहरले..!
गोवा राज्य आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असले, तरी आता गोवा राज्यालगत असलेल्या कोकण किनारपट्टीलाही पर्यटकांची भुरळ पडू लागली आहे. नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकण किनारपट्टीला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे सध्या कोकणात पर्यटन बहरले आहे. स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे, वॉटरस्पोर्ट्स, डॉल्फीन सफर पर्यटकांसाठी पर्वणी ठरतेय. येत्या काळात पर्यटकांसाठी दर्जात्मक सुविधा निर्माण करून दिल्यास कोकण किनारपट्टीही आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून नकाशावर येऊ शकते.
नाताळ किंवा सुट्ट्यांचा आनंद लुटायला पर्यटनाला जायचे म्हटले, की आठवते ते गोवा. ‘जीवाचा गोवा’ करायला अनेक पर्यटक सुट्ट्यांमध्ये जात असतात. गोवा राज्यही तेवढ्याच दर्जाच्या सुविधा पर्यटकांना देते. म्हणूनच गोवा राज्य हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले आहे. परंतु गोवा राज्याला लागून असलेल्या कोकण किनारपट्टीवर स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे असूनही पर्यटक कोकणात न थांबता, थेट गोव्यातच जात होते. मात्र, गेल्या पाच-दहा वर्षांत पर्यटकांना सुविधा देण्यावर महाराष्ट्र सरकारने भर दिला आहे. त्यामुळे कोकणात पर्यटकांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे. यावर्षीचा नाताळ व 2024 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 2025 या नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालेली आहे.
ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू आहेत. थंडीचा हंगामही सध्या आहे. मुलांच्या परीक्षांचेही सध्या टेन्शन नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकाही झाल्या आहेत. त्यामुळे व्यस्त कामातून बाहेर पडलेले अधिकारी, कर्मचारी किंवा इतर नागरिक सध्या पर्यटन हंगामाचा आनंद लुटण्यासाठी विविध पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. त्यामुळे कोकणाला पर्यटनासाठी सुगीचे दिवस आले आहेत. कोकणात साधारणत: डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिने पर्यटनासाठी फार महत्त्वाचे ठरतात. दोन्ही महिन्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यानंतर पुन्हा उन्हाळी सुट्टीत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. कोकण रेल्वेच्या दळणवळणाच्या सुविधेमुळे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागूनच असलेल्या मोपा विमानतळामुळे काही पर्यटक, तर विकएंडला सुद्धा पर्यटनासाठी येत असतात. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, पुढील काळात अतिशय दर्जात्मक पर्यटन सुविधा द्याव्या लागणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे येथे धार्मिक व निसर्ग पर्यटनस्थळामुळे पर्यटनाला येणाऱ्यांची बारमाही गर्दी असते. पावस येथील स्वामी स्वरुपानंद यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर भक्त येत असतात. सध्याला चित्र पाहता आता इयर एंडिंग असल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्व निवासस्थाने सध्या फुल्ल झाली आहेत. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी असलेल्या निवास-न्याहरी योजनेलाही पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दापोली, गुहागर, रत्नागिरी येथील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत. रत्नागिरीत येणारे पर्यटक रत्नागिरी नजीकच्या भाटये, आरेवारे येथेही गर्दी करत आहेत.
कोकणात रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी होत आहे. गेल्या काही वर्षांपासून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत. देवगडच्या समुद्र किनाऱ्यावर झिपलाईनची सुविधा, पवनचक्की येथे गार्डनची सुविधा, प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर, विजयदुर्ग येथील ऐतिहासीक विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. गोवा राज्य जसे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध झालेय तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्र किनाराही आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरही देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. गतवर्षी 4 डिसेंबर 2023 ला याच तारकर्ली पर्यटन किनारी नौदल दिन साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला खास उपस्थित राहिले होते. त्यामुळे मालवणचा तारकर्ली समुद्र किनारा अधिकच प्रसिद्धीस आलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भर समुद्रात उभारलेला अभेद्य सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी, तर दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. तारकर्लीच्या बाजूलाच देवबाग समुद्र किनाऱ्यावर जलक्रीडा सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक या जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. सिंधुदुर्ग किल्ल्यालगत सुरू पेलेल्या स्कुबा डायव्हिंगमुळे समुद्राखालचे जग पाहता येते. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीत पर्यटकांची सर्वाधिक पसंती कुठे असेल, तर ती मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळत आहे. नाताळ, वर्ष अखेर असल्याने आणि नव्या वर्षाचे स्वागत म्हणून हा मालवणचा किनारा हाऊसफुल्ल झालेला आहे. 5 जानेवारीपर्यंत शहर परिसरातील हॉटेल्स, रिसॉर्ट, लॉज ही सर्व निवासस्थाने हाऊसफुल्ल झालेली आहेत. या पर्यटनाबरोबरच खवय्यांना मासळी खाण्याचा मनमुराद आनंद लुटता येत आहे.
जिल्ह्यातीलच वेंगुर्ले तालुक्यातही आता पर्यटनाचा बहर येऊ लागला आहे. याठिकाणी वेंगुर्ले आणि खवणे समुद्र किनारा येथे बॅक वॉटरच्या भागात कायाकिंगची सुविधा निर्माण केल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी येऊ लागले आहेत. विशेषत: खवणे खाडीमध्ये कयाक सफरच्यावेळी विविध प्रकारचे पक्षी, कांदळवन याचाही अभ्यास करता येत आहे. पर्यटन म्हणून आनंद लुटता येत आहे. त्यामुळे अशा अनेक पर्यटनस्थळांमुळे कोकणात आता दिवसेंदिवस लाखोंच्या पटीत पर्यटकांची संख्या वाढत चाललेली आहे. म्हणूनच सध्या नाताळ, वर्ष अखेर आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोकणात पर्यटनाला बहर आलेला आहे, असेच म्हणता येईल.
गोवा राज्य हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असले, तरी अलीकडील काही वर्षात तेथे पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीच्या गजबजाटामुळे काही पर्यटक शांत असलेल्या व स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे असलेल्या कोकण किनारपट्टीकडे वळू लागले आहेत. अनेक सेलिब्रिटी पर्यटनासाठी कोकणात येऊ लागले आहेत. चित्रपटांचे चित्रीकरणही कोकणात सुरू झाले आहे. त्यामुळे कोकणात येणारे पर्यटक वाढत असतील, तर येथील लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारला पर्यटकांना दर्जेदार सुविधा द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी पर्यटन विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून किनारपट्टीपर्यंत जाणारे उत्तम दर्जाचे रस्ते, स्वच्छतागृहे व अन्य सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. मालवण-तारकर्ली हे पर्यटनस्थळ आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत प्रसिद्धीस आले असले, तरी या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना नेहमीच वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते. अनेक ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था नसते. या सर्व व्यवस्था आगामी काळात कराव्या लागणार आहेत.
कोकणात पर्यटन वाढीसाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक महोत्सव गेल्या पाच-दहा वर्षांपासून सुरू करण्यात आले आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक लोककला सादर केल्या जातात. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना लोककला पाहायला मिळत आहेत. कोकणातील समुद्र किनाऱ्यांबरोबरच धार्मिक स्थळेही प्रसिद्ध आहेत. ही धार्मिक स्थळे पाहण्यासाठी सुद्धा अनेक धार्मिक पर्यटक याठिकाणी येत आहेत.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केसरी येथे फिश अॅक्वॅरियम सुरू करून जगभरातील वेगवेगळ्या जातींचे मासे पाहण्यासाठी उपलब्ध केल्याने याठिकाणीही पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. आंबोलीच्या पायथ्याशीच केसरी गाव असल्याने आंबोलीच्या पर्यटनाबरोबरच केसरी येथील फिश अॅक्वॅरियमला पर्यटक भेटी देत आहेत. शैक्षणिक सहलीही तेथे जाऊ लागल्या आहेत. पुढील काळात वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावर पाणबुडी प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास पर्यटनासाठी मोठी उपलब्धी असणार आहे. त्यामुळे कोकणसाठी आता पर्यटनाकरिता चांगले दिवस येऊ लागले आहेत. मात्र, कोकणात येणाऱ्या पर्यटकांना अतिशय चांगल्या, दर्जेदार सुविधा देण्याची जबाबदारी येथील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि राज्य सरकारला पार पाडावी लागणार आहे.
संदीप गावडे