पर्यटन, उद्योग क्षेत्राने अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करावे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : अग्निशामक दिनानिमित्त सांतइनेज येथे कार्यक्रम
पणजी : पर्यटन आणि उद्योग क्षेत्रातील सर्व संबंधितांनी अग्निसुरक्षेसाठीचे सर्व नियम, अटींचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. अग्निशामक दिनानिमित्ताने सांतइनेज, पणजी येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. सावंत हे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. ते म्हणाले की, हडफडे येथे बर्च क्लब अग्निकांडात मागील वर्षी डिसेंबरात अनेकांचे बळी गेले. ती घटना भयानक होती. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून सर्व संबंधितांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे तसेच सुरक्षा उपाययोजना आखली पाहिजे. ती फार महत्त्वाची आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
अग्निपासून सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी
उद्योग आणि पर्यटन क्षेत्रातील विविध आस्थापनांना अग्निशामक दलातर्फे सुरक्षा प्रमाणपत्रे देण्यात येतात. अग्निपासून सुरक्षा करणे ही केवळ त्या दलाची जबाबदारी नाही तर ती सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी जागरूक राहणे व जागृती करणे अत्यावश्यक आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी सर्वांनी सतर्क असले व राहिले पाहिजे. जनतेची देखील ती जबाबदारी असून आग लागू नये म्हणूनच सर्वांनी प्रयत्न करणे व उपाय आखणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांनी, 2025 सालची आकडेवारी आपल्या भाषणातून सादर केली. एकूण 8021 फोन आले. त्यात 2942 आगीसंदर्भात तर 5072 आपत्कालीन होते. दलाने 165 जणांचा (व्यक्ती) तर 874 जनावरांचा जीव वाचवला. मदतीसाठी 112 नंबरवर फोन करावा, असे आवाहन त्यांनी केले.
राज्य प्रशिक्षण नियंत्रण कक्ष बनणार अकादमी
अग्निशामक दलातर्फे तिन्ही जिह्यामध्ये प्रत्येकी एक नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम) स्थापन करण्यात येणार असून त्यानुसार पणजी, मडगांव व कुडचडे येथे हा कक्ष उभारण्याची योजना आहे. राज्य प्रशिक्षण नियंत्रण कक्षाचे रुपांतर अकादमीत होणार असून तेथे दलाचे जवान व सर्व सामान्य लोकांनाही अग्निपासून सुरक्षा देण्याची व घेण्याची प्रशिक्षण संधी उपलब्ध करणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.