कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पावसामुळे पर्यटन, मासेमारी हंगाम बुडाला

04:48 PM May 23, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश स्थितीमुळे हंगाम समाप्तीअगोदरच मासेमारी आणि सागरी जलपर्यटन हे दोन्ही व्यवसाय बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. गेले तीन दिवस वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळणाऱ्या पावसाने कोकणातील पर्यटन आणि मासेमारीचे आर्थिक गणित पुरते बिघडवून टाकले आहे. कोट्यावधीची उलाढाल ठप्प झाली आहे. पावसाने महावितरणचीही दाणादाण उडाली असून अनेक घरे अद्याप अंधारात आहेत. विजेअभावी व्यापारी वर्गालासुद्धा मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम आता कोकण किनारपट्टीवर जाणवू लागला आहे.

Advertisement

देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर 1 जूनपासून यांत्रिकी नौकांची मासेमारी बंद होणार आहे. 31 जुलैपर्यंत ही बंदी असेल. तर सागरी जलपर्यटन हंगाम 25 मे रोजी समाप्त होणार आहे. सागरी जलप्रवासी वाहतूक बंदीचा कालावधी 26 मे ते 31 ऑगस्ट असा राहील. सागरी मासेमारी बंदीचा 61 तर सागरी जलपर्यटन बंदीचा 98 दिवसांचा हा कालावधी विचारात घेता मे महिन्याचा अंतिम टप्पा रत्नागिरी-सिंधुदुर्गातील पर्यटन, मासेमारी व्यावसायिकांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. परंतु यंदा हंगाम समाप्ती अगोदरच वादळी हवामानाने जोर धरल्याने येथील पर्यटन आणि मत्स्य व्यावसायिकांची मोठी निराशा झाली आहे.

मत्स्य हंगामाच्या अखेरीस मच्छीमार पावसाळ्याची बेगमी करून ठेवण्यासाठी दररोज मासेमारीस जाण्यावर भर देत असतात. शिवाय मे महिन्यात पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत असल्याने मासळीला चांगला भावसुद्धा मिळतो. अशा प्रकारे पर्यटन आणि मासेमारी हे दोन्ही व्यवसाय एकमेकांना पूरक आहेत. परंतु वादळी हवामानामुळे अंतिम टप्प्यातील आर्थिक उत्पन्नास मच्छीमारांना मुकावे लागले आहे.

तसेच मासेमारी व पर्यटन या दोन्ही व्यवसायांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचाही रोजगार बुडाला आहे. आता दोन-तीन दिवसांनी समुद्र शांत झाला तरी उरलेल्या काही दिवसांसाठी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नौका मासेमारी सज्ज ठेवणाऱ्या मच्छीमारांचे प्रमाण अत्यल्प असेल. अनेक मच्छीमारांनी आवराआवर सुरू केली आहे. त्यामुळे बाजारात माशांची आवक हळुहळु कमी होणार आहे.

मे महिन्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून जातात. मागील आठवडा अखेरीस मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले होते. कोकणातील ठिकठिकाणची पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली होती. पर्यटकांचा हा ओघ मेच्या तिसऱ्या आठवड्यातही कायम राहणार होता. हॉटेल व्यावसायिकांना बऱ्यापैकी बुकींग होते. त्या अनुषंगाने सर्व पर्यटन व्यावसायिक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. पण मान्सूनपूर्व पावसाने या सर्वांच्या उत्साहावर पाणी फेरले. पावसामुळे अनेक बुकींग रद्द झाली. हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा आर्थिक बसला. तसेच खंडित वीज पुरवठ्यामुळे साठवणुकीची समस्या निर्माण होऊन मासळी, मटण, चिकन, आईस्क्रीम व अन्य दुग्धजन्य पदार्थांचे मोठे नुकसान झाले.

गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसाला वादळसदृश वाऱ्याने प्रारंभ झाला. या वादळी वाऱ्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील अनेक भागात पडझड होऊन वीज पुरवठा खंडीत झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोकणातील भौगोलिक परिस्थिती, तक्रारींची संख्या या तुलनेत वीज वितरणचे मनुष्यबळ अपुरे पडल्याने काही भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात वीज वितरणला अपेक्षित वेग राखता आलेला नाही. त्यामुळे जनतेमध्ये संतप्त भावना आहेत. सततच्या वादळवाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात निर्माण होणारी विजेची समस्या कायमची दूर व्हावी, याकरीता दीर्घकालीन उपाय मानली जाणारी भूमिगत वीज वाहिनी योजना लवकरात लवकर मार्गी लावावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांच्यानिर्मितीचे प्रमाण हे नेहमीच जास्त राहिले आहे. एका आकडेवारीनुसार 1891 ते 2000 पर्यंत देशाच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलेल्या वादळांची संख्या 308 इतकी होती. यात तीव्र स्वरुपाची वादळे 103 होती. तर पश्चिम किनाऱ्यावर 48 वादळे आली. त्यापैकी 24 वादळे तीव्र स्वरुपाची होती. त्यामुळे चक्रीवादळांच्या बाबतीत पश्चिम किनारपट्टी नेहमीच सुरक्षित असल्याचे मानले जात होते. परंतु गेल्या 20 वर्षात अरबी समुद्रातही वादळांची संख्या आणि त्यांची तीव्रता वाढली आहे. अरबी समुद्राच्या तापमानात होत असलेली झपाट्याने वाढ आणि वातावरणातील बदल ही यामागची महत्वपूर्ण कारणे आहेत. या हवामान बदलाचा मोठा फटका कोकणच्या अर्थव्यवस्थेला बसतो आहे. केवळ मासेमारी, पर्यटनच नव्हे तर आंबा बागायतदार आणि शेतकरी वर्गही सततच्या हवामान बदलामुळे त्रस्त आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article