For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅरेबियन देशांचा दौरा -भारताची क्रिकेट कूटनीती

06:41 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅरेबियन देशांचा दौरा  भारताची क्रिकेट कूटनीती
Advertisement

क्रिकेट या खेळाचा उपयोग कुटनीतीसाठी कसा केला जाऊ शकतो हे जमेकाच्या उदाहरणावरून सिद्ध होते. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जमेकाच्या क्रीडा रसिकांना इलेक्ट्रॉनिक्स स्कोर बोर्ड भेट दिला व त्याचे उद्घाटनही केले. भारताची क्रिकेट कूटनीती वाखाणण्यासारखी आहे.

Advertisement

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे जगातील अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची तुलना करता एक अभ्यासू कल्पक चतुरस्त्र आणि प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास, मूलभूत स्वरूपाचा असून त्यांची मांडणी ही शास्त्राrय व वस्तुनिष्ठपणे केलेली असते. त्यामुळे जगातील नामांकित वृत्तवाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती ऐकणारा एक त्यांचा स्वतंत्र असा वाचक वर्ग निर्माण झाला आहे. त्यांच्या तेजपुंज प्रतिभाशाली दृष्टीचे प्रतिबिंब नुकत्याच त्यांनी पूर्ण केलेल्या कॅरेबियन देशांच्या दौऱ्यातून दिसले आहे. दिनांक 2 ते 10 मे दरम्यान त्यांनी जमेका, सुरीनाम तसेच त्रिनिदाद व टोबॅगो या देशांचा दौरा पूर्ण केला. हा दौरा भारताच्या ग्लोबल साउथ उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषत: कॅरेबियन सागर क्षेत्रामध्ये भारताचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने या दौऱ्याला एक विशेष महत्त्व आहे. तसेच जगाच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या देशांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने भारताने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नरेंद्र मोदी युगातील भारताचे सामर्थ्य एक जागतिक सत्ता म्हणून वाढले आहे आणि त्यामुळे भारताचे सक्रियपणे समर्थन करणाऱ्या देशांची संख्या सुद्धा जगभरात वाढत आहे.

शाश्वत विकासाचे भागीदार

Advertisement

हे सर्व देश आकाराने आणि लोकसंख्येने फार मोठे नसले तरी त्यांचे आपले स्वत:चे स्थान आहे. विशेषत: तेथे राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या भावना व त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत नेहमीच त्यांच्या सुखदु:खात गतिमानपणे सहभागी होत असतो. परराष्ट्र मंत्र्यांनी जमेका या देशाचा पूर्ण केलेला दौरा हा पहिलाच द्विपक्षीय भागीदारीवर भर देणारा होता. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणजे युपीआय तसेच आरोग्य, नवीकरणीय ऊर्जा आणि सुरक्षा या क्षेत्रामधील द्विपक्षीय सहकार्यावर भर देणारे आणि सांस्कृतिक संबंधांना नवी गती व दिशा देणारे हे धोरण आहे. या दौऱ्यात त्यांनी जमेकामधील क्रिकेट मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे पाऊल टाकले. जमेका येथे भारताप्रमाणेच क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे. तेथील क्रिकेटच्या विकासासाठी परराष्ट्र मंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक्स स्कोर बोर्ड भेट दिला आणि क्रिकेटच्या जगातील जमेकाच्या योगदानाचे कौतुक केले तसेच याच मैदानावर राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी केलेल्या कामगिरीचे त्यांनी स्मरण करून दिले. क्रीडा क्षेत्रात एक सॉफ्ट पॉवर म्हणून भारताचा गतीने उदय होत असताना भारत आपल्या क्रीडा क्षेत्रातील क्षमतांचे मित्र राष्ट्रांना सामर्थ्य व लाभ प्राप्त करून देण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. त्याचे प्रस्तुत क्रिकेट मुत्सद्देगिरी हे एक चांगले उदाहरण म्हटले पाहिजे

परराष्ट्र मंत्र्यांच्या कॅरेबियन भेटीची फलश्रुती

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि अभ्यासू सुसंवादामुळे या देशांच्या नेत्यावर विलक्षण प्रभाव टाकला आहे. 2 ते 4 मे दरम्यान त्यांची पहिली भेट जमेका या देशाला झाली. भारत आणि जमेका दरम्यान आरोग्य, सौर ऊर्जा आणि प्रसारण सहकार्य या क्षेत्रामध्ये तीन सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या. याव्यतिरिक्त जमेकाने भारताच्या 2018-29 च्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी जागेसाठी केलेल्या प्रयत्नाला पाठिंबा देण्याचे अभिवचन दिले आहे. मानवतावादी मदत आणि सहकार्य हे दोन्ही देशाच्या संबंधातील आणखी एक महत्त्वाचे सूत्र आहे. भारताने जमेकाला दहा डायलेसिस युनिट पुरविण्याची घोषणा केली आहे. आपत्ती निवारणासाठी जीपीएस उपकरणासह 40 मासेमारी बोटीसुद्धा भेट दिल्या आहेत. या व्यतिरिक्त जमेकातील लोकांसाठी आयटीसी प्रशिक्षणाच्या जागा 34 पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.

धोरणात्मक उपक्रमांचा विचार करता असे दिसते की कारागीर सक्षमीकरणासाठी केंद्र उभारणे, डिजिटल पेमेंटच्या प्रगतीस गती देणे याबाबतीत सुद्धा सकारात्मक चर्चा करण्यात आली. ओल्ड हार्बर स्मारकामध्ये जाऊन तेथे भारतीय समुदायाच्या सेवांचा सन्मान करण्यात आला. आतापर्यंतच्या इतिहासात जमेकाला भेट देणारे एस जयशंकर हे पहिले भारतीय परराष्ट्रमंत्री असल्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व देण्यात आले आणि त्यांनी या देशाबरोबर क्रिकेट मुत्सद्देगिरीचा एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. जमेकातील क्रिकेटच्या लोकप्रियतेचा भारतीय क्रिकेट वीरांच्या कामगिरीचा संदर्भ देऊन संबंध अधिक सांस्कृतिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला.

सुरीनाम भेटीचे महत्त्व

आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुरीनाम या कॅरेबियन सागरातील देशाला भेट दिली. त्यांच्या या भेटीचा मुख्य उद्देश तेथील बहुसंख्य भारतीय समुदायाशी सुसंवाद साधणे हा होता. द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दमदार पावले टाकली. 6 मे रोजी ते फार्म रिबो या शहरात पोहोचले तेथे त्यांनी राष्ट्रपती जेनिफर गिलिक्स सायन्स यांची उच्चस्तरीय भेट घेऊन त्यांच्यासोबत बैठका घेतल्या आणि द्विपक्षीय संबंधावर खुल्या दिल्याने चर्चा केली. सुरीनाममधील गिरमिटिया समुदाय हा ब्रिटीश काळात तेथे पोहोचला आणि आता तो तेथील राज्यकर्ता वर्ग बनला आहे. त्यामुळे या समुदायांची सुखदु:खे समजून घेणारा हा दौरा महत्त्वाचा होता.

कोरोना महामारीच्या काळात भारताने सुरीनामला भरघोस सहाय्य केले. तसेच भारत या देशाचा एक मोठा भागीदार देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनीही सुरीनामला भेट देऊन सांस्कृतिक संबंध मजबूत केले आहेत. आता परराष्ट्र मंत्र्यांनी या संबंधाचा आढावा घेऊन त्याला एक नवी दिशा दिली आहे. सहा कलमी आराखडा द्वीपक्षीय संबंध मजबूत करून मैत्रीपूर्ण संबंधांना चालना देण्यासाठी त्यांनी आपले समकक्ष सुरीनामचे परराष्ट्रमंत्री व अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या संयुक्त आयोग बैठकीदरम्यान सहा कलमी आराखडा विकसित करण्यात आला आहे. त्यामध्ये सांस्कृतिक आणि धोरणात्मक सहभाग हा जणू या कराराचा आत्मा होय. त्यांनी मारी एन बर्ग येथील शहीद वीरांच्या स्मारकावर आदरांजली वाहिली. ब्रिटिश काळात तेथे सेवेसाठी गेलेल्या गिरमित्या मजुरांचे हे स्मारक म्हणजे या राष्ट्राच्या उभारणीचा एक महत्त्वाचा पाया होय. सूरीनामच्या सर्वंकष विकासासाठी रचनात्मक पाठिंबा देण्याचे भारताचे सूत्र हे तेथील भारतीय समुदायांच्या मनातील विश्वास वाढविणारे आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुरीनामच्या विकासाला सक्रिय पाठिंबा देण्याच्या आणि या देशाच्या समृद्धीमध्ये भरघोस योगदान देण्याच्या भारतीयाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यामुळे तेथील स्थानिक भारतीय समुदायांमध्ये मोठे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे सुरीनाममधील यशस्वी कामगिरीनंतर नऊ दिवसांच्या कॅरेबियन दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात त्यांनी मौलिक मुत्सद्देगिरीचे दर्शन घडविले.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.