ऑस्ट्रेलियन भूमीत खडतर आव्हानं !
भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचलाय अन् नुकताच किवीजकडून ‘न भूतो’ दणका मिळाल्यानं त्यांच्यावर तिथं उसळी घेण्याच्या दृष्टीनं मोठा दबाव राहील...याबाबतीत खडतर ‘कसोटी’ लागेल ती निश्चितच फलंदाजांची. त्याचबरोबर अश्विन, रवींद्र जडेजासारख्या आपल्या फिरकीच्या हुकमी एक्क्यांपेक्षा जास्त भार पेलावा लागणार तो वेगवान गोलंदाजांना...
भारतीय वऱ्हाड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सामोरं जाण्याकरिता ऑस्ट्रेलियात पोहोचलंय...आणि न्यूझीलंडकडून स्वीकाराव्या लागलेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर विश्लेषक, टीकाकार फटके मारण्यास सज्ज झालेत...कांगारुंच्या भूमीचा दौरा कधीच सोपा राहिलेला नसला, तरी यावेळी तो थोडा जास्तच खडतर वाटतोय हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाहीये...उसळत्या चेंडूंचा प्रसाद भारतीयांना देण्यासाठी विख्यात पर्थ येथील खेळपट्टीवर बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेतील पहिला चेंडू टाकला जाणार तो 22 नोव्हेंबर रोजी. याचा अर्थ पहिल्या कसोटीच्या तयारीसाठी आहेत ते आजपासून सात दिवस. त्यापूर्वी सर्वांत आधी खेळाडूंचा आत्मविश्वास पुन्हा उंचावण्याचं आव्हान ‘गंभीर अँड कंपनी’पुढं उभं ठाकलंय...
सर्वांत जास्त दबाव असेल तो आपल्या फलंदाजांवर. कारण न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली होती, परंतु फलंदाज त्यावर कळस चढविण्यास सपशेल अपयशी ठरले...संघाचं ढासळलेलं मनोधैर्य उंचावताना पहिल्या कसोटीत नेतृत्व कोण करणार ही अनिश्चितता हा लेख लिहिताना तरी दूर झालेली नव्हती. अर्थात रोहितच्या अनुपस्थितीत उपकर्णधार नि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ती जबाबदारी पेलेल हे उघड. रोहित नसल्यास दुसऱ्या सलामीवीराची जागा भरण्याचं ‘टेन्शन’ येईल ते वेगळं...यशस्वी जैस्वालचा नवीन जोडीदार शोधण्याच्या बाबतीत के. एल. राहुल नि अभिमन्यू ईश्वरन ही नावं पुढं आलीत. परंतु भारत ‘अ’ कडून ऑस्ट्रेलियात खेळताना दोघांनाही फारसे दिवे लावता आलेले नाहीत. तरीही मुख्य प्रशिक्षकांनी गरज पडल्यास ती जागा भरून काढण्याच्या त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखविलाय...
तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास येणारा शुभमन गिल याला सुद्धा याबाबतीत एक पर्याय म्हणून विचारात घेता येईल. कारण 2020-21 मधील पदार्पणाच्या मालिकेत गिलनं 51.80 च्या सरासरीनं 259 धावा केल्या होत्या त्या सलामीवीराच्या भूमिकेतच. त्यावेळी ब्रिस्बेन कसोटीतील ऐतिहासिक विजयाचा पाया रचताना त्यानं दुसऱ्या डावात 91 धावा फटकावल्या होत्या...फलंदाजीचं हे दुखणं केवळ सलामीपुरतंच मर्यादित नाही...रोहित नि विराट कोहली या दोन दिग्गज फलंदाजांच्या बॅटमधून बरसणाऱ्या धावा अलीकडच्या काळात विलक्षण आटल्याहेत. दोघांनाही न्यूझीलंडच्या मालिकेत अनेक वेळा अपयशाचं तोंड पाहावं लागलं अन् सहा डावांत नोंदविता आलं ते केवळ एक अर्धशतक...
परंतु याचा अर्थ गोलंदाज ताणमुक्त असतील असा मात्र नव्हे. कारण त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असेल ती फलंदाज अपयशी ठरल्यास ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या रचण्यापासून रोखण्याची वा कांगारुंना कमी धावसंख्येत गुंडाळून आपल्या फलंदाजांना मोठी मजल मारण्याची संधी देण्याची...भारतानं ऑस्ट्रेलियाचा शेवटचा दौरा केला होता तो 2020-21 मोसमात अन् त्यावेळी क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता तो आपल्या सळसळणाऱ्या नवीन रक्ताच्या वेगवान गोलंदाजांनीच...
त्याच्या दोन वर्षं आधी कांगारुंना हादरा देण्याचं काम इमाने इतबारे केलं होतं ते जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी नि इशांत शर्मा या जबरदस्त त्रिकुटानं. यावेळी मात्र भारताच्या जलदगती गोलंदाजांच्या फौजेला दर्जेदार बुमराह व प्रसंगी विलक्षण भेदक बनण्याची ताकद बाळगणारा मोहम्मद सिराज यांचा अपवाद सोडल्यास अननुभवीच म्हणावं लागेल. आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा व हर्षित राणा यांचं वर्णन करावं लागेल ते अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हवा तितका अनुभव नसलेले ‘कच्चे’ खेळाडू अशा शब्दांत...
अजित आगरकर यांच्या निवड समितीनं पाच ‘पेसर्स’ अन् तीन राखीव जलदगती गोलंदाजांची निवड केलीय. विशेष म्हणजे भारत विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकेल का या प्रश्नाचं उत्तर मिळणार ते कांगारुंच्या भूमीत. 2020-21 च्या दौऱ्याच्या वेळी शमी, इशांत, उमेश यादव व शेवटच्या कसोटीत बुमराह नसूनही भारतानं विलक्षणरीत्या ऑस्ट्रेलियाला पाणी पाजलं होतं. पण त्यावेळी प्रमुख गोलंदाजांच्या गैरहजेरीत दुसऱ्या फळीची जी साथ कर्णधाराला मिळाली तशी ती यावेळी मिळण्याची शक्यता बहुतेकांना कमीच वाटतेय...
तीन वर्षांमागचा विचार केल्यास नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे जवळपास परिपक्व जलदगती गोलंदाज बनले होते आणि त्याचं सारं श्रेय नवोदितांना अप्रतिमरीत्या मार्गदर्शन केलेल्या महान राहुल द्रविडच्या कर्तृत्वाला...प्रसिद्ध प्रशिक्षकांच्या मतानुसार, जलदगती गोलंदाजांची फळी जन्म घेते ती पाच वर्षांच्या अफाट मेहनतीनंतरच. मात्र त्यातील एखादा खेळाडू चमकेल की नाही हे सांगणं मात्र निव्वळ अशक्य. हर्षित राणानं फक्त 10 प्रथम श्रेणी सामन्यांना तोंड दिलंय, तर प्रसिद्ध कृष्णानं अवघ्या 20. त्यांची निवड बंगालतर्फे गेल्या पाच वर्षांपासून रणजी चषक स्पर्धेत दणदणीत कामगिरी करून दाखविणाऱ्या मुकेश कुमारला डावलून करण्यात आलीय...
काही जणांच्या मते, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हर्षित राणासाठी हट्ट धरल्यानं त्याचा संघात समावेश करण्यात आलाय. अनेकांना वाटतंय की, दिल्लीचं प्रतिनिधीत्व करणारा राणा हा उज्ज्वल भवितव्य असलेला खेळाडू असून एखाद्या आव्हानाला तोंड देण्यास तो कधीही कमी पडलेला नाहीये. परंतु जर त्याची निवड भारताच्या ‘अ’ संघात झाली असती, तर त्याला ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या नि ‘कुकाबुरा’ चेंडू यांचा अनुभव जास्त चांगल्या पद्धतीनं घेणं शक्य झालं असतं, आपल्या टप्प्याला योग्य पद्धतीनं राखणं जमलं असतं...
अन्य एक वादाचा विषय म्हणजे नवदीप सैनीची सतत होणारी राखीव खेळाडू म्हणून निवड...सैनी धावा जास्त देतो हे जवळपास प्रत्येक सामन्यानं दाखवून दिलंय. या पार्श्वभूमीवर जर जसप्रीत बुमराहवर दुर्दैवानं बाहेर बसण्याची पाळी आल्यास सारा भार वाहावा लागेल तो मोहम्मद सिराजला. काही वर्षांपूर्वी प्रचंड कौतुक झालेला सिराज सध्या मात्र विदेश दौऱ्यावर गेलाय तो आपली ‘लय’ पुन्हा मिळविण्यासाठी. यंदाचा मोसम त्याच्यासाठी फारसा लाभदायक ठरलेला नाहीये. तरी देखील कित्येक प्रशिक्षक मोहम्मद सिराज याच नावाला पाठिंबा देतात. कारण त्यांना वाटतंय की, गरज आहे ती सिराजचा आत्मविश्वास वाढविण्याची. प्रतिस्पर्धी फलंदाजांना सळो की पळो करण्याची ताकद असलेला हा वेगवान गोलंदाज अनुभवाच्या बाबतीत मात्र अजिबात कमी नाहीये. सध्या त्याला त्रास देतेय ती त्याची हरवलेली ‘लय’. शमीच्या गैरहजेरीत त्याच्यावर दबाव निश्चित असेल. परंतु जर त्याला ‘फॉर्म’ गवसला, तर त्याच्यात क्षमता आहे ती ‘गेमचेंजर’ बनण्याची...
प्रसिद्ध कृष्णा देखील द्रविडचा ‘प्रोजेक्ट’मधील एक आवडता खेळाडू...त्याच्याजवळ चेंडूला झपकन उसळविण्याची कला असून त्यामुळं तो कित्येकदा अतिशय घातक गोलंदाज बनतो. तथापि ‘कुकाबुरा’ चेंडूची शिवण लवकर दबली जात असल्यानं गरज भासेल ती एका बाजूनं टिच्चून मारा करणाऱ्या खेळाडूची, तर दुसऱ्या बाजूनं बुमराहसारख्या भारत्यात विविध अस्त्रं असलेल्या गोलंदाजांची. एक मात्र खरं की, नवीन गोलंदाजांच्या तुकडीला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बरीच मोठी कसरत करावी लागेल...
भारतानं ऑस्ट्रेलियातील मागील दोन मालिका जिंकून दाखविल्या असून ती जखम यजमानांना निश्चितच अस्वस्थ करतेय. निर्भय दृष्टिकोन ही त्या यशामागची गुऊकिल्ली होती...सध्याच्या संघानंही असाच दृष्टिकोन बाळगावा आणि उसळत्या, गवताळ खेळपट्ट्यांना तोंड देताना जराही विचलित होऊ नये अशी गंभीरची इच्छा. सध्याच्या संघात ती ताकद निश्चितच दडलीय, गरज आहे ती त्या दिशेनं संपूर्ण प्रयत्न करण्याची !
- राजू प्रभू