पुतळ्याला हात लावला...आणि...
वस्त्रप्रावरणांच्या विक्रीकेंद्राबाहेर वस्त्रांची जाहीरात करण्यासाठी पुतळे उभे केलेले असतात हे आपण नेहमी पाहिले आहे. या पुतळ्यांवर वस्त्रे चढविलेली असतात. ही विविध प्रकारची वस्त्रे किंवा कपडे आपल्या अंगावर कसे दिसतील याची ग्राहकाला कल्पना यावी, तसेच विक्री केंद्राची लोकप्रियता वाढावी अशा दोन्ही हेतूंनी हे स्त्री-पुरुषांचे पुतळे किंवा अर्थपुतळे उभे केले असल्याचे आपण पहातो.
अशाच एका विक्री केंद्रासमोर एक पुरुष आणि एका महिलेचा पुतळा ठेवलेला होता. एका तरुणाने ते पुतळे पाहिले. या दोन पुतळ्यांमधील महिलेला पुतळा त्याला अतिशय आवडला. तो अगदी खऱ्या सुंदर महिलेसारखा दिसत होता. त्यामुळे त्याला हात लावण्याचा त्याला मोह झाला. बोलून चालून हा पुतळाच आहे, खरी महिला तर नव्हे, मग त्याला हात लावला तरी काही गहजब होणार नाही, याची त्याला शाश्वती वाटत होती. म्हणून त्याने आजूबाजूला कोणीही नाही हे पाहून त्या महिलेच्या पुतळ्यावरुन हात फिरविण्यासास प्रारंभ केला...
तथापि, त्या पुतळारुपी महिलेने एका हाताने त्याला चक्क ढकलून दिले. या अनपेक्षित धक्क्याने तो इतका हादरला की, भीतीने त्याचे हृदय बंद पडले की काय असे त्याला क्षणभर वाटते. पण वस्तुस्थिती अशी होती की तो पुतळा नव्हताच. तर ती एलेना नामक तरुणीच होती. या तरुणीने अनेक तास एकाजागी पुतळ्याप्रमाणे स्तब्ध उभे राहण्याचे कौशल्य साध्य केलेले होते. तिच्या शरीराच्या कोणत्याही भागाची किंचितही हालचाल न होता ती अशा प्रकारे पुतळ्याप्रमाणे उभे राहू शकते. त्यामुळे तो एका महिलेचा पुतळाच आहे, अशी पाहणाऱ्या प्रत्येकाची समजूत होते. काही मोजक्याच व्यक्तींकडे असे कौशल्य असते. या प्रसंगातून सर्वांसाठी ‘दिसते तसे नसते’ हा धडा मिळतो. सध्या या प्रसंगाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत असून तो दीड कोटी लोकांनी पाहिला आहे.