टोरेंट करणार जेबी फार्माची खरेदी
25,689 कोटी रुपयांचा करार -हिस्सा खरेदीनंतर दोन्ही कंपन्यांचे होणार विलीनीकरण
वृत्तसंस्था/ मुंबई
अहमदाबाद येथील औषध कंपनी टोरेंट फार्मास्युटिकल्स 25,689 कोटी रुपयांच्या इक्विटी मूल्यांकनाने जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स (जेबी फार्मा) मधील मोठी हिस्सेदारी खरेदी करणार आहे, जो अलीकडच्या काळात देशांतर्गत औषध बाजारपेठेतील सर्वात मोठ्या करारांपैकी एक आहे. टोरेंट इन्व्हेस्टमेंट फर्म केकेआरकडून हा हिस्सा खरेदी केल्यानंतर दोन्ही कंपन्या विलीन होणार असल्याची माहिती आहे.
केकेआर प्रायव्हेट इक्विटीने 2024 पर्यंत भारतात 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यांनी अलीकडेच त्यांच्या खासगी कर्ज शाखेद्वारे मणिपाल ग्रुपमध्ये 600 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. हा करार दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात, केकेआरचा जेबी फार्मामधील 46.39 टक्के हिस्सा खरेदी होईल. हा करार प्रति शेअर 1,600 रुपये या किमतीत 11,917 कोटी रुपयांचा असेल. दुसऱ्या टप्प्यात, जेबी फार्मामधील 26 टक्के हिस्सेदारीसाठी भागधारकांना 1,639.18 रुपये प्रति शेअर या किमतीत ओपन ऑफर दिली जाणार आहे.
याव्यतिरिक्त, टोरेंटने जेबी फार्माच्या काही कर्मचाऱ्यांकडून 2.8 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासही रस दाखवला आहे, असे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासाठीही केकेआरची किंमत असेल. करारानंतर, टोरेंट फार्मा आणि जेबी फार्मा यांचे विलीनीकरण अशा प्रकारे केले जाईल की जेबी फार्माच्या प्रत्येक 100 शेअर्ससाठी, टोरेंट फार्माचे 51 शेअर्स दिले जातील. जेबी फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णवेळ संचालक निखिल चोप्रा म्हणाले की, कंपनी गेल्या पाच वर्षांत भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या औषध कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2025 मध्ये 12 टक्क्यांच्या वाढीसह 3,918 कोटी रुपये राहील.