विषय संपवावा : अन्नपूर्णा रेस्टॉरंटचे आवाहन
सीतारामन यांच्यासोबत झाला होता वाद
वृत्तसंस्था/ चेन्नई
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून कोइम्बतूरमध्ये जीएसटी संबंधी आयोजित कार्यक्रमात रेस्टॉरंट मालकाच्या झालेल्या कथित अपमानाचे प्रकरण संपुष्टात आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन संबंधित रेस्टॉरंटने केले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन, अण्णाद्रमुक तसेच अन्य पक्षांनी टीका सुरू केली होती. घटनेसंबंधी वाद उभा ठाकल्याने अन्नपूर्णा रेस्टॉरंटने वक्तव्य जारी करत स्थिती स्पष्ट केली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. श्रीनिवासन यांनी रेस्टॉरंट आणि बेकरींमध्ये वेगवेगळ्या उत्पादनांसाठी असलेल्या वेगवेगळ्या जीएसटी दरांचा मुद्दा उपस्थित केला होता.
सीतारामन यांच्यासोबतच्या चर्चेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर श्रीनिवासन यांनी स्वेच्छेने वैयक्तिक स्वरुपात अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती. खासगी संभाषणाचा व्हिडिओ चुकून सोशल मीडियावर शेअर झाला, यामुळे गैरसमज आणि गोंधळ निर्माण झाला असल्याचे रेस्टॉरंटकडून नमूद करण्यात आले. तर भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी भाजप पदाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ शेअर करण्यात आल्याप्रकरणी माफी मागितली आहे.