Kolhapur News | टोप येथील भुयारी मार्गात गुडघाभर पाणी; खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनधारकांचा जीव मुठीत!
टोप -राष्ट्रीय महामार्गावरील टोप महाडिक कॉलनी येथून वडगावकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाची दुरवस्था गंभीर बनली असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. भुयारी मार्गातील मोठमोठे खड्डे पाण्याखाली गेल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघातांच्या घटनाही घडल्या आहेत.
कोल्हापूरहून टोपमार्गे वडगावकडे जाणाऱ्या या भुयारी मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. जोतिबा दर्शनासाठी येणारे- जाणारे हजारो भाविक, आष्टा, तासगाव, विटा, इस्लामपूर, सांगली परिसराकडे जाणारी वाहने तसेच स्थानिक ग्रामस्थ याच मार्गाचा वापर करतात. पावसाळ्यात या मार्गात गुडघाभर पाणी साचत असल्याने वाहनचालकांना वाहनाचा वेग कमी करून सावधगिरीने मार्ग काढावा लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, मोठ्या वाहनांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. वाहणाची मोठी गर्दी असते.
महामार्गाच्या पश्चिम बाजूस असलेल्या टोप व संभापूर परिसरातील शेकडो एकर शेतीकडे जाण्यासाठी शेतकरी याच भुयारी मार्गाचा वापर करतात. शेतीची कामे, दूध वाहतूक, शेतीमालाची ने-आण तसेच विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालयासाठीची ये-जा या मार्गावरूनच होत असल्याने या रस्त्याचे महत्त्व अधिक आहे. दर गुरुवारी भरणाऱ्या टोपच्या आठवडी बाजारासाठीही आसपासच्या गावांतील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने याच मार्गाने ये-जा करतात. त्यामुळे हा भुयारी मार्ग कायमच गजबजलेला असतो.महामार्गाच्या अधिकारी वर्गाला फोन केलाअसता करू बघू अशी उत्तरे देत आहेत.
दरम्यान, भुयारी मार्गाची दिवसेंदिवस होत असलेली दुरवस्था आणि पावसाळ्यात निर्माण होणारी धोकादायक परिस्थिती लक्षात घेता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने पाहणी करून खड्ड्यांची दुरुस्ती, पाण्याचा निचरा आणि रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी जोरदार मागणी वाहनधारक, ग्रामस्थ, शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे. स्थानिक प्रशासनानेही या प्रश्नात लक्ष घालून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी,