‘टॉप थाय ब्रँड’चे मुंबईत आयोजन; थायलंडचे वाणिज्य सल्लागार डॉ. चेतन नरके यांची माहिती
आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
कोल्हापूर प्रतिनिधी
मुंबई येथे मार्च महिन्यात टॉप थाय ब्रँडचे आयोजन करणार असल्याची माहिती थायलंडचे वाणिज्य सल्लागार डॉ. चेतन नरके यांनी दिली. या इव्हेंटमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार आहेत. यामधून भारत व थायलंडमध्ये व्यवसाय वृद्धींगत होण्यास मदत होईल. तसेच यामधून तरुणांना नवीन व्यवसायामध्ये उतरण्याची संधी मिळणार असल्याचेही डॉ. नरके यांनी सांगितले.
डॉ. नरके म्हणाले, थायलंडच्या नॅशनल डे निमित्त 30 नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यशाळेत 35 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये भारत आणि इतर देशांमध्ये व्यवसायवृद्धी वाढविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले. यामध्ये विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या उत्पदनांची माहिती दिली. येथील फाँड्री व्यवसाय, सोन्याचे दागिने, कोल्हापूरी चप्पल, गुळ, काकवी अशा उत्पादनांची माहिती दिली. यामधून कोल्हापूरच्या व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केला. पुढील काळातही जीडीपीमध्ये कोल्हापूर पुन्हा एक नंबरवर आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. नरके यांनी सांगितले.
त्याबरोबर मार्च 2024 मध्ये महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये टॉप थाय ब्रँडचे आयोजन करणार आहे. यामध्ये थायलंडमधील अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणारा आहेत. यामध्ये या कंपन्यांचे स्टॉल असणार असून त्यांच्या उत्पादनाची माहिती घेवून देशातील उद्योजकांना, तरुणांना त्यांच्यासोबत व्यवसाय करण्याची संधी मिळणार असल्याचे डॉ. नरके यांनी सांगितले.