किनाऱ्यावर मिळाला विलुप्त प्राण्याचा दात
इंग्लंडच्या ईस्ट लेन बीचवरील घटना
अनेकदा अशा गोष्टींवर नजर पडते, ज्याविषयी लोकांना माहिती नसते. परंतु त्या गोष्टीचे सत्य समोर येताच वैज्ञानिकही थक्क होत असतात. इंग्लंडच्या सफोक भागातील ईस्ट लेन बीचवर फिरताना 11 वर्षीय चार्ली ऑर्चर्ड-लिस्ले नावाच्या मुलाची नजर लाटांदरम्यान पडलेल्या अजब गोष्टीवर पडली. पाहण्यास तो सामान्य दगड वाटला, परंतु नंतर चार्ली आणि त्याच्या आईला तो काहीसा वेगळा वाटला. आात ही वस्तू लाखो वर्षे जुन्या इतिहासाशी जोडली गेली आहे.
या शोधामुळे प्राचीन जगाच्या विशाल प्राण्यांचा इतिहास समजून घेण्यास मदत मिळू शकते. हा काही सामान्य दगड नव्हता, तर एका विलुप्त झालेल्या हत्तीसारख्या प्राण्याचा दात होता. हा दात सुमारे 18 लाख वर्षे जुना असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
चार्ली स्वत:ची आई एलेनॉरसोबत डसे गावातील ईस्ट लेन बीचवर हिंडत होता. याचदरम्यान त्याला समुद्राच्या लाटांदरम्यान एक मोठासा दगडासारखा तुकडा दिसला. चार्ली त्याच्या काही मिनिटांपूर्वीच हत्तीविषयी बोलत होता. याच्या सुमारे 10 मिनिटांनी अनोखी वस्तू मिळाली. त्याचा आकार अन् रचना पाहून हा काही सामान्य दगड नसल्याचे त्वरित कळले. चार्लीने या अवजड तुकड्याला स्वत:च्या वडिलांना दाखविले. परिवाराने याची छायाचित्रे तज्ञांना पाठविल्याचे एलेनॉर यांनी सांगितले.
वैज्ञानिकांचा खुलासा
परिवाराकडून पाठविण्यात आलेल्या छायाचित्रांची तपासणी करण्यात आली. यानंतर लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे वैज्ञानिक प्राध्यापक एड्रियन लिस्टर यांनी याची ओळख पटविली. हा एनानकस आर्वर्नेंसिस नावाच्या विलुपत हत्तीसारख्या प्राण्याच्या उजव्या हिस्स्याचा दात असल्याचे त्यांनी सांगितले. या हत्तीच्या आजच्या हत्तींचा दूरचा नातेवाईक मानले जाऊ शकते असे त्यांचे सांगणे आहे. ही प्रजाती लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होती आणि सुमारे 8.5 दशलक्ष वर्षांपूर्वी याचे पृथ्वीवर अस्तित्व होते याचे पुरावे मिळाले आहेत.