For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाय दाखविण्यासाठी नेले, लग्न लावले

06:24 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
गाय दाखविण्यासाठी नेले  लग्न लावले
Advertisement

बिहारमध्ये घडलेली ही एक अद्भूत घटना आहे. या राज्याच्या खगडिया जिल्ह्यातील एका गावातील युवक मन्नयम कुमार याला त्याच्या काही परिचितांनी गाय दाखविण्यासाठी सिराजपूर या गावात बोलाविले. मन्नयम कुमार याला गाय खरेदी करायची होती. त्यामुळे त्याने या निमंत्रणाचा स्वीकार केला. तो सिराजपूर गावात पोहचताच त्याला काही शस्त्रधारी लोकांनी घेरले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला एका स्थानी नेण्यात आले. तो जाण्यास टाळाटाळ करु लागला. तथापि, त्याला चाकू-सुऱ्याचा धाक दाखविण्यात आला आणि त्या स्थानी नेण्यात आले. तेथे विवाहाची सज्जता करण्यात आली होती. त्याला याचे आश्चर्य वाटले.

Advertisement

नंतर या युवकाला सक्तीने बोहल्यावर चढविण्यात आले आणि त्याचा विवाह कुंदन कुमारी नामक युवतीशी लावण्यात आला. हा विवाह आपल्या इच्छेविरुद्ध लावण्यात आला आहे, असे या युवकाचे म्हणणे आहे. तथापि, तेथे तो काहीही बोलू शकला नाही. कारण तो एकटा होता आणि अनेक शस्त्रधारी लोक त्याच्या अवती-भोवती होते. विवाह झाल्यानंतर त्याला पत्नीसह वधूच्या गावी आणून सोडण्यात आले. त्याने आता पोलिसात तक्रार केली असून आपला इच्छेविरुद्ध जबरदस्तीने विवाह लावण्यात आला आहे, असे त्याने तक्रारीत नमूद केले आहे.

पण कुंदन कुमारी हिचे म्हणणे वेगळेच आहे. हा विवाह जबरदस्तीने लावण्यात आलेला नाही. माझी आणि मन्नयम कुमार याची अनेक दिवसांपासून मैत्री आहे. आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो. आम्हाला विवाह करायचाच होता. तथापि, मन्नयम कुमार याने टाळाटाळ चालविली होती. त्यामुळे त्याचा माझ्याशी विवाह करुन देण्यात आला. हे अपहरणाचे प्रकरण नाही. त्यामुळे हा विवाह जबरदस्तीला लावला, असे म्हणणे चुकीचे आहे. अनोळखी युवकाला पकडून आणून त्याच्याशी मी विवाह कशाला करीन, असा उलटा प्रन तिने विचारला आहे. त्यामुळे हे एकंदर प्रकरण स्वारस्यपूर्ण बनले आहे. आता पोलिसांनी या संदर्भात पतीची आणि त्याच्या नातेवाईकांची तक्रार नोंदवून घेतली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास चालविला आहे. वराला आता वधूच्या घरातून सोडविण्यात आले असून त्याला त्याच्या घरी आणण्यात आले आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.