For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रस्ता नसल्याने जीव गेला? हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचाराला विलंब; जत तालुक्यातील टोणेवाडीत शेतकऱ्याचा मृत्यू

12:41 PM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
रस्ता नसल्याने जीव गेला  हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचाराला विलंब  जत तालुक्यातील टोणेवाडीत शेतकऱ्याचा मृत्यू
Advertisement

जतपूर्व : सांगली जिल्हा जत तालुक्यातील टोणेवाडी येथील शेतकरी सत्याप्पा निवृत्ती नुलके यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात नेण्यासाठी शेतरस्ता उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण झाल्याची घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर टोणेवाडीतील शेतरस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

गुरुवारी, 17 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 7 वाजता सत्याप्पा नुलके यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र शेतापर्यंत वाहन जाण्यासाठी पुरेसा रस्ता नसल्याने त्यांना बाहेर आणताना अडचणी निर्माण झाल्या.

कुटुंबीयांनी येळवी आणि टोणेवाडी परिसरातील वाहनमालकांशी संपर्क साधून मदत मागितली. मात्र रस्त्याअभावी वाहन शेतापर्यंत नेणे शक्य झाले नाही. अखेर म्हमदाबाद येथून वाहन बोलावण्यात आले. त्यानंतर नुलके यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारासाठी पोहोचण्यास झालेल्या विलंबानंतर त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

फेब्रुवारीपासून शेतरस्त्याची मागणी

टोणेवाडीतील संबंधित शेतरस्त्याबाबत शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यातच तहसीलदारांकडे अर्ज करून रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित ठिकाणी स्थळ पाहणीही केली होती. मात्र पाहणीनंतरही प्रत्यक्ष रस्त्याचे काम किंवा पुढील कार्यवाही अद्याप झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हृदयविकार, सर्पदंश, अपघात किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वेळेत वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र शेतापर्यंत वाहन पोहोचण्यासाठी रस्ता नसल्यास गंभीर परिस्थितीत मोठा विलंब होऊ शकतो. नुलके यांच्या निधनामुळे हा प्रश्न अधिक गंभीरपणे समोर आला आहे.

भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला रस्त्याअभावी उपचारासाठी विलंब होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.