For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतराळात उगवले टोमॅटो

06:22 AM Feb 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंतराळात उगवले टोमॅटो
Advertisement

अंतराळ स्थानकात टोमॅटोचे पीक घेण्यात चीनला यश आले आहे. चीनच्या अंतराळवीरांनी या स्थानकात टोमॅटोची शेती करण्याचा प्रयोग अल्पप्रमाणात केला. तो सफल झाल्याने अंतराळात पीके येऊ शकतात, ही बाब पुन्हा सिद्ध झाली आहे. या अंतराळ स्थानकातील चीनी अंतराळवीरांनी यंदाचा शीतमहोत्सव याच टोमॅटोंच्या साहाय्याने साजरा केल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे. चीनचे हे यश अंतराळ संशोधनाला अधिक प्रोत्साहन देणारे ठरले आहे. मात्र हे टोमॅटो पृथ्वीवरच्या टोमॅटोंच्या प्रमाणे मातीत उगवलेले नाहीत. त्यांच्या उगवणीसाठी ‘एअरोपोनिक’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. हे विषेश तंत्रज्ञान आहे.

Advertisement

या तंत्रज्ञानात मातीचा उपयोग केला जात नाही. रोपट्यांना एकत्र बांधून त्यांच्या मुळांवर पाण्यापासून निर्माण करण्यात आलेले दव शिंपडण्यात आले आहे. तसेच वनस्पतींना अन्न निर्माण करण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. ही आवश्यकता विशेष एलईडी दिव्यांच्या प्रकाशाचे झोत सोडून पूर्ण करण्यात आली आहे. हे सर्व प्रयोग ‘शून्य गुरुत्वाकर्षण’ स्थितीत करण्यात आले. या स्थितीमुळे टोमॅटोंच्या झाडांना पाणीही कमी पुरले. पाणी कमी असूनही झाडांची वाढ मात्र जोमाने आणि कमी वेळात झालेली दिसून आली आहे. हे प्रयोग एक विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी करण्यात येत आहेत. मानवाला मंगळावर वस्ती करता यावी, यासाठी आता प्रयत्न करण्यात येत आहेत. पृथ्वीवरच्या मानवाने मंगळावर वस्ती केली, तर त्याच्या अन्नाची आवश्यकता त्याला तेथेच भागवावी लागणार आहे. अंतराळात पिके येऊ शकली, तर मंगळावरच्या भूमीत किंवा तेथील विरळ वातावरणातही ती येऊ शकणार आहेत. तसे झाल्यास मानव मंगळावर प्रदीर्घ काळा किंवा स्थायी स्वरुपाची वस्ती करु शकणार आहे. या दीर्घकालीन उद्दिष्ट्यांसाठी हे अंतराळातील प्रयोग महत्वाचे ठरणार आहेत, अशी माहिती संशोधक देत आहेत.

अंतराळात टोमॅटोचे पीक उगविल्याने अंतराळवीरांनाही मानसिक समाधान लाभले आहे. एका निर्मनुष्य स्थानी त्यांना हिरवळीचा अनुभव घेता आल्याने ते सुखावले आहेत. तसे संदेश त्यांनी पृथ्वीवर पाठविले आहेत. भारताने अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे नुकतेच अंतराळ स्थानकात वास्तव्य करुन आले आहेत. त्यांनी तेथे भारतीय डाळींच्या अंकुरांची उगवण केली होती. या प्रयोगांमधून संकलित झालेला विदा किंवा डाटा पुढील प्रयोगांसाठी उपयुक्त अत्यंत उपयोगाचा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.