For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टोमॅटो टेम्पोची चार गाड्यांना धडक

03:03 PM Jul 04, 2025 IST | Radhika Patil
टोमॅटो टेम्पोची चार गाड्यांना धडक
Advertisement

पुसेगाव :

Advertisement

पुसेगाव-सातारा रस्त्यावर विसापूर फाट्यावर सातारा बाजूकडून अत्यंत बेपर्वाईने पुसेगावकडे टोमॅटो घेऊन येणाऱ्या टेम्पो ट्रॅक्सच्या धडकेत एक दुचाकी आणि तीन चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुसेगाव (ता. खटाव) नजीक असणाऱ्या विसापूर फाट्यावर गुरुवारी सायंकाळी थरारक हिंदी सिनेमात शोभेल असा विचित्र अपघात झाला. गाडीची चारही चाके रस्त्यावर नाहीत तरीही गाडी रस्त्यावर मात्र विरुद्ध लेनवर एका अंगावर पलटी होऊन सुसाट येतेय, योग्य दिशेने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना काय करावे हे सुचायच्या आतच धडक! नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात किमान आठ व्यक्तींचा जीव वाचला.

Advertisement

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सातारा बाजूकडून पुसेगावकडे भरधाव वेगाने टोमॅटो घेऊन येणाऱ्या टेम्पो ट्रॅक्सच्या वाहनचालकाचा ताबा सुटल्याने प्रथम एका चारचाकी गाडीला धडक दिली. गाडीत प्रमाणापेक्षा जास्त टोमॅटो कॅरेटमुळे गाडीला झोला बसल्याने पुन्हा थोड्या अंतरावर गाडी वाहनचालकांच्या बाजूने रस्त्यावरच पलटी होऊन पलिकडच्या लेनमध्ये सुमारे 50 फूट फरफटत गेली. त्यावेळी पुसेगावकडून कोरेगावच्या दिशेने निघालेल्या चारचाकी आणि एका दुचाकी गाडीला धडक बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. या विचित्र अपघातात आर्थिक नुकसान झाले असले तरीही कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्त वाहनातील टोमॅटो दुसऱ्या वाहनात हलविण्याचे काम चालू होते. माहिती मिळताच पुसेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement
Tags :

.