केरळात मुलांमध्ये फैलावतोय टॉमेटो फ्ल्यू
कोल्लम जिल्हय़ात आढळले 80 रुग्ण : लहान मुलांमध्येच संक्रमण
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
कोरोना संक्रमण अद्याप संपलेले नसताना एका नव्या आजाराने देशात शिरकाव केला आहे. या नव्या आजाराचे नाव टॉमेटो फ्ल्यू आहे. या आजाराने संक्रमित झाल्यावर शरीरावर लाल रंगाचे पुरळ येऊ लागतात, याचमुळे याला टॉमेटो फ्ल्यू हे नाव देण्यात आले आहे.
टॉमेटो फ्ल्यूचे संक्रमण केरळच्या कोल्लम जिल्हय़ात फैलावत आहे. येथे आतापर्यंत 80 मुलांमध्ये हे संक्रमण दिसून आले आहे. या सर्व मुलांचे वय 5 वर्षांपेक्षा कमी आहे. केरळमध्ये टोमॅटो फ्ल्यूचे वाढते रुग्ण पाहता तामिळनाडू आणि कर्नाटकात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
टॉमेटो फ्ल्यू एक संसर्गजन्य आजार आहे. याचा संसर्ग झाल्यावर शरीरावर लाल रंगाचे पुरळ उठू लागतात, त्वचेचा दाह होतो आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. टोमॅटो फ्ल्यू सध्या मुलांमध्ये फैलावत आहे. केरळमध्ये 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलेच यामुळे संक्रमित होत आहेत.
टोमॅटो फ्ल्यूची लक्षणे
टोमॅटो फ्ल्यूमध्ये चिकनगुनियासारखीच लक्षणे दिसून येतात. यामुळे संक्रमित झाल्यावर तीव्र ज्वर, अंगदुखी, सांध्यांमध्ये सूज आणि थकवा जाणवू लागतो. परंतु यामुळे संक्रमित मुलांमध्ये त्वचेचा दाह आणि पुरळ उठू लागले आहेत. तसेच पोटदुखी, उलटी किंवा अतिसाराची तक्रार दिसून येत आहे. याचबरोबर हात तसेच गुडघ्यांसह शरीराच्या काही हिस्स्यांचा रंगही बदलत आहे. परंतु हा आजार नेमका कुठून आला हे अद्याप समजू शकलेले नाही. आरोग्य अधिकारी सध्या टोमॅटो फ्ल्यूच्या योग्य कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
केरळमध्ये फैलाव
केरळच्या कोल्लम जिल्हय़ात 80 हून अधिक मुले टोमॅटो फ्ल्यूने संक्रमित आहेत. कोल्लमसह अर्यानकावु, आंचल आणि नेंदूवाथुरमध्येही काही रुग्ण आढळून आले आहेत. केरळमध्ये रुग्ण वाढल्याने त्याला लागून असलेल्या मंगळूर, उडुपी, चामराजनगर आणि म्हैसूरमध्ये देखरेख वाढविण्यात आली आहे. केरळमधून येणाऱया प्रवाशांवर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बचावाचा मार्ग हा आजार नवा असल्याने अद्याप यासंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. याचमुळे यावर ठोस उपाय अद्याप उपलब्ध नाही. संक्रमणापासून वाचण्यासाठी भोवताली साफसफाई ठेवण्याची गज्रा आहे. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये. पाणी पित रहावे. याचबरोबर कुठलेही लक्षण दिसून आल्यास त्वरित डॉक्टरकडे धाव घ्यावी. मुलांमध्ये संक्रमण असल्यास त्यांना खाजविण्यापासून रोखावे अशा सूचना आरोग्य अधिकाऱयांनी केल्या आहेत.