तोमरच्या शतकाने राजस्थान उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/बडोदा
2025 च्या क्रिकेट हंगामातील विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात सलामीचा फलंदाज अभिजित तोमरच्या शानदार शतकाच्या जोरावर राजस्थानने तामिळनाडूचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. राजस्थान संघाचा तामिळनाडूवरील हा पहिलाच विजय आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानचा डाव 47.3 षटकात 267 धावांत आटोपला. सलामीच्या तोमरने 125 चेंडूत 111 धावांची खेळ करताना कर्णधार महिपाल लोमरोर समवेत दुसऱ्या गड्यासाठी 160 धावांची भागिदारी केली. तामिळनाडूचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने 5 गडी बाद केले. तसेच त्याने फलंदाजीत 18 चेंडूत 22 धावा जमविल्या.
त्यानंतर तामिळनाडूचा डाव 47.1 षटकात 248 धावांत आटोपला. राजस्थान संघातील शेखावतने 58 धावांत 3 गडी बाद केले. आता या स्पर्धेत राजस्थान आणि विदर्भ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना रविवारी खेळविला जाईल. तोमरचे लिस्ट ए क्रिकेट प्रकारातील हे चौथे शतक आहे. तामिळनाडूविरुद्ध त्याने 4 षटकार आणि 12 चौकार ठोकले. या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात हरियाणाने आपल्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर बंगालचा 72 धावांनी पराभव करत शेवटच्या 8 संघात स्थान मिळविले. हरियाणा संघातर्फे पार्थ वत्सने 77 चेंडूत 62 तर निशांत संधूने 67 धावांत 64 धावा जमविल्या. गोलंदाजीत या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. हरियाणाच्या डावात एसपी कुमारने समयोचित फलंदाजी केल्याने हरियाणाने 50 षटकात 9 बाद 298 धावा जमविल्या. बंगालतर्फे मोहम्मद शमीने 3 गडी बाद केले. त्यानंतर बंगालचा डाव 43.1 षटकात 226 धावांत आटोपला. आता हरियाणा आणि गुजरात यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना शनिवारी खेळविला जाईल.