Toll Plaza: जकात नाक्याच्या इमारती धुळखात, कोल्हापूर, इचलकरंजीतील प्रकार
जकात नाके सध्या गर्दुल्यांना नशापान करण्याची आश्रयाची ठिकाणे बनली आहेत
By : राजेंद्र होळकर
कोल्हापूर : कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे सगळ्यात मोठे साधन असलेल्या शहराच्या चारी रस्त्यावरील वेशीवरील जकात नाक्याच्या इमारती सध्या अडगळीत पडल्या आहेत. या दोन शहरातील काही जकात नाक्यांमधील साहित्य चोरीला गेले आहे. काही जकात नाके सध्या गर्दुल्यांना नशापान करण्याची आश्रयाची ठिकाणे बनली आहेत.
राज्य सरकारने महानगरपालिका आणि मोठ्या नगरपालिकेच्या हद्दीत जकातीऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महानगरपालिका आणि मोठ्या नगरपालिकाचे जकात घेण्याचे बंद झाल्याने, जकात नाक्याना टाळे लागले.
जकात बंद केल्यानंतर एन्ट्री टॅक्स बसवण्याचा विचार होता. एलबीटीमध्ये एन्ट्री टॅक्सचाही पर्याय न राहिल्याने, एकेकाळी महानगरपालिका आणि मोठ्या नगरपालिकेचे उत्पन्नाचे सगळ्यात मोठे साधन असलेले जकात नाके बंद करावे लागल्याने. महानगरपालिका आणि नगर पालिकांमधील जकात विभाग देखील बंद पडला. परिणामी त्यांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला.
नाक्याच्या इमारतीमध्ये निवारा केंद्र
राज्य सरकारने शहराच्या एक लाख लोकसंख्येमागे रात्र निवारा केंद्र उभारण्याचे धोरण आहे. या धोरणानुसार कोल्हापूरातील शाहू आणि शिरोली टोल नाक्याच्या इमारतीमध्ये दोन रात्र निवारा केंद्रे सुरु करण्याबाबत प्रस्तावीत केली. त्यामुळे शिरोली टोल नाक्याच्या इमारतीमध्ये निवारा केंद्र सुरु केले आहे.
नाक्याच्या इमारतीचा ताबा गर्दुल्यांकडे
कोल्हापूर शहराच्या उचगांव, शिये नाका, फुलेवाडी, कळंबा, लोणार वसाहत या नाक्याच्या इमारती सध्या धूळ खात आहेत. या इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत. खिडक्यांच्या काचा, गज तुटून गेले आहेत. त्यामुळे टोल नाक्याच्या या पडीक इमारतीचा ताबा गर्दुल्या तरुणांनी घेतला आहे. गर्दुल्याकडून या इमारतीमध्ये दारु, गांजा, अंमली पदार्थाच्या सेवनासाठी वापर केला जाऊ लागला आहे.
इचलकरंजीतील काही इमारती भाडेतत्वावर
एकेकाळी राज्यातील सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून इचलकरंजी पालिकेला ओळखले जात होते. जकात बंद झाल्याने, या पालिकेच्या उत्पन्नामध्ये मोठी तूट पडली. शहराच्या चारही रस्त्यांवर जकातीसाठी नगरपालिकेने इमारती उभ्या केल्या होत्या.
त्यापैकी स्टेशन रोडवरील पंचगंगा साखर कारखाना आणि कोल्हापूर या सारख्या काही जकात नाक्याच्या इमारती महानगरपालिकेने सध्या वार्षिक भाडेतत्वावर भाड्याने दिल्या आहे. अन्य जकात नाक्याच्या इमारती धुळ खात पडल्या आहेत.