For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पायाच्या अंगठ्यांची कुस्ती

07:00 AM Feb 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
पायाच्या अंगठ्यांची कुस्ती
Advertisement

जगात कुस्ती हा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. अनेक प्रकारच्या कुस्त्या आहेत. सध्या ब्रिटनमध्ये ‘पायाच्या अंगठ्यांची कुस्ती’ किंवा ‘टो रेसलिंग’ नावाचा प्रकार बराच लोकप्रिय होत आहे. या प्रकाराचा उगम केव्हा आणि कुठे झाला, याविषयी बरीच मतमतांतरे आहेत. तथापि, लवकरच हा खेळ सर्वतोमुखी होण्याची शक्यता आहे, इतक्या वेगाने तो प्रसारित होत आहे. या खेळाचा इतिहास काही शतकांचा आहे, अशी माहिती दिली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्येच त्याचा बोलबाला झाला असल्याचे दिसून येते. हा पुरातन खेळ असला, तरी त्याच्या आधुनिक आवृत्तीचा प्रारंभ साधारणत: पन्नास वर्षांपूर्वी, अर्थात, 1974 मध्ये झाला आहे. या खेळात कुस्ती केवळ पायाच्या अंगठ्यांची गेली जाते. दोन प्रतिस्पर्धी त्यांच्या पायांचे अंगठे एकमेकांशी भिडवितात हा खेळ खेळतात. कुस्तीप्रमाणे या प्रकरातही अनेक डावपेच असतात. या खेळाची एक स्पर्धाही भरविली जाते. तिला ‘टो रेसलिंग चँपियनशीप’ असे नाव आहे.

Advertisement

अनेक देशांचे ‘अंगठेबहाद्दर’ या स्पर्धेत भाग घेतात. या खेळासाठी प्रशिक्षण देण्याची सोयही काही स्थानी आहे. खेळाडूंना विशिष्ट प्रकारे व्यायाम करुन आपल्या पायांचे अंगठे बळकट करावे लागतात. एका मोठ्या लाकडी ठोकळ्यावर दोन प्रतिस्पर्धी आपल्या एका पायाचा अंगठा एकमेकांशी भिडवितात आणि या कुस्तीचा प्रारंभ होतो. या खेळाचे शास्त्रशुद्ध नियमही बनविण्यात आले असून जो खेळाडू आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पायाचा अंगठा खाली दाबेल, तो विजयी घोषित केला जातो. डावपेचांच्या आणि परिश्रमांच्या संदर्भात हा खेळ नेहमीच्या मॅटवरील किंवा आखाड्यातील कुस्तीपेक्षा कमी कौशल्याचा नसतो, असे मत या खेळासंबंधी जाणकारांनी व्यक्त केले आहे. 1976 ते 1994 या काळात हा खेळ जवळपास लोप पावला होता. मात्र, 1994 मध्ये एका व्यक्तीला या खेळाची एक जुनी नियमपुस्तिका मिळाली आणि या खेळाला नवजीवनदान मिळाले. तेव्हापासून तो पुन्हा लोकप्रिय झाला असून खेळाडूंची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या खेळाला कधीना कधी ऑलिंपिक किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये स्थान मिळेल, अशी आशा आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.