आज, उद्या मुसळधार पावसाचा इशारा
पणजी : नैऋत्य मान्सून गोव्यात सक्रिय झाला असून आज 28 व उद्या 29 मे रोजी गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा देऊन हवामान खात्याने दोन दिवसांकरिता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर 30 मे ते दोन जूनपर्यंत गोव्यात मध्यम प्रमाणात पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात राज्यात सरासरी दीड इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदाचा मान्सूनपूर्व पाऊस आतापर्यंत 22 इंच नोंदविला गेला आहे.
दिवसभरात मध्यम पाऊस
गोव्यात काल दिवसभरात मध्यम तथा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पहाटे संपूर्ण गोव्यात जोरदार पाऊस पडला. गेल्या 24 तासात सुमारे तीन इंच पावसाची नोंद म्हापसा येथे झाली, तर पेडणेमध्ये पावणेतीन इंच पाऊस पडला. होंडा येथे अडीच इंच तर मुरगावमध्ये दोन इंच, जुने गोवे व पणजी येथे प्रत्येकी दोन इंच, मडगाव, केपे, काणकोण, सांखळी येथे प्रत्येकी दीड इंच पावसाची नोंद झाली. दाभोळी व सांगे येथे प्रत्येकी एक इंच तर वाळपई व धारबांदोडा येथे प्रत्येकी पाऊण इंच पाऊस पडला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यात पावणे दोन इंच तर दक्षिण गोव्यात दीड इंच पावसाची नोंद झाली. यामुळे यंदाच्या मान्सूनपूर्व पावसाची नोंद आतापर्यंत बावीस इंच एवढी झाली आहे. प्रत्यक्षात पावसाळी मोसम एक जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाची प्रत्यक्षात नोंद एक जूनपासूनच केली जाणार आहे.
आगामी 24 तासात मुसळधार
हवामान खात्याने आगामी 24 तासात गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. आज व उद्या ऑरेंज अलर्ट जारी करून मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह पडणार असल्याचे कळविले आहे. त्यानंतर पुढील चार दिवस काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे म्हटले आहे.
तापमान उतरले खाली
या पावसामुळे व सोबत येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे सध्या गोव्याचा पारा बराच खाली उतरला असून मंगळवारी कमाल तापमान 28 अंश एवढे राहिले तर किमान तापमान हे 25 अंश राहिले. आज व उद्या जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 55 किलोमीटर तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटर एवढा राहील. त्यामुळे खोल समुद्रात मच्छीमारांनी जाऊ नये, असा इशारा दिला आहे.