आज एकाच दिवशी तीन सणांची महापर्वणी !
‘सुताची पुनव’, नारळी पौर्णिमा अन् रक्षाबंधन!
पणजी : नारळी पौर्णिमा गोव्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. गोव्यात नारळी पौर्णिमेला ‘सुताची पुनव’ असेही म्हटले जाते. प्रत्येक वर्षी श्रावण शुद्ध पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. समुद्रदेवतेच्या पूजेपासून ते रक्षाबंधन कार्यक्रमांपर्यंत या उत्सवाची विविधता आणि महत्व आज सर्वांमध्ये विशेष असते. एकाच दिवशी तीन सणांच्या या महोत्सवाने राज्यातील एकत्र कुटुंबपणा, सामाजिक एकता आणि पर्यावरणीय जागऊकतेला प्रोत्साहन मिळत असते. राज्यातील किनारपट्टीच्या भागांत सगळकडेच या सणाला आगळे वेगळे महत्व आहे. मच्छीमार बांधवांसाठी हा दिवस म्हणजे पर्वणीच असतो. विशेषत: नारळी पौर्णिमेला साजरा होणारा रक्षाबंधन हा सण भाऊ - बहिणीच्या नात्याची पवित्रता दर्शवितो. भावाच्या हातात बांधल्या जाणाऱ्या एका धाग्याने हे नाते केवळ चिरकाल टिकून राहत नाही, तर त्यातून या नात्याला अंत:करणीय भावबंधाची किनार लाभल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. नारळी पौर्णिमा राज्यातील विशेषत: किनारी भागात साजरी केली जाते. मात्र रक्षाबंधन राज्यभरात उत्साहाने साजरे केले जाते. याशिवाय या दिवशी वैदिक परंपरेनुसार घरातील देव, देवता, वस्तू त्याचप्रमाणे पुऊषांद्वारे जानवे देखील प्रदान केले जाते.
पारंपरिक मासेमारी आजपासून
गोवा हा किनारपट्टीचा प्रदेश. गोव्यातील आहारातील मासळी हा प्रमुख खाद्य प्रकार आहे. मासेमारी करून गोव्यात उदरनिर्वाह करणारे धार्मिक परंपरेनुसार मासेमारी हंगामाची सुऊवात आजपासून करतात. समुद्राची कृपा रहावी, समुद्रातून भरपूर मासे मिळावेत अशी प्रार्थना करून समुद्राची नारळ अर्पण करून पूजा केली जाते. त्याचप्रमाणे नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवद्य बोटींना आणि समुद्राला दाखवून समुद्राची यथासांग पूजा केली जाते.
बाजारपेठा सजल्या राख्यांनी...
या उत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातील बाजारपेठांत खास रंगत बघायला मिळत आहे. विविध प्रकारच्या राखी, मिठाईच्या दुकानावर विविध खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. हल्ली राख्यांचे आकार बदलेले आहेत. पूर्वी केवळ धागा वापरला जायचा. काही वर्षापूर्वीपर्यंत मोठ्या आकाराच्या राख्या बाजारात मिळत होत्या. आता मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या, डिझाईनच्या आधुनिक पद्धतीच्या राख्या बाजारात दिसत असून मुलांसाठी या राख्या आकर्षण ठरत आहे.