आज ‘जय बापू, जय भीम,जय संविधान’चा नारा
म. गांधीजींच्या पुतळ्याचे होणार अनावरण : काँग्रेस अधिवेशनाचा शतकमहोत्सव कार्यक्रम
बेळगाव : महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली 1924 साली बेळगावात पार पडलेल्या काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज मंगळवारी सुवर्णसौध येथील आवारात महात्मा गांधींजींच्या पुतळ्याचे सकाळी 10.30 वा. अनावरण केले जाणार आहे. त्याचबरोबर क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकार आणि काँग्रेस पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, तसेच काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही येणार आहेत.
बेळगावात महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी काँग्रेस पक्ष व राज्य सरकारकडून डिसेंबर 2024 मध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने सदर मेळावा रद्द करावा लागला. त्यानंतर आता मंगळवारी काँग्रेसच्या बेळगावातील शतकमहोत्सवी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र जाहिरात फलक व आकर्षक कमानी उभारण्यात आल्या आहेत. यापूर्वीच राज्य प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, पर्यटनमंत्री एच. के. पाटील, रामलिंग रेड्डी, वीराप्पा मोईली यांच्यासह पक्षाचे विविध नेते बेळगावात तळ ठोकून आहेत.
म. गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण
सुवर्णविधानसौध येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता पुतळ्याचे अनावरण होईल. सुवर्णसौधच्या उत्तर प्रवेशद्वारावर अनावरण करण्यात येणारा महात्मा गांधींजींचा पुतळा 25 फूट असून त्याचे वजन 20 टन आहे. या पुतळ्यासाठी 4.83 कोटी ऊपये खर्च करण्यात आले असून पंचधातूची आहे. म्हैसूर येथील मूर्तिकार अरुण योगीराज यांनी हा पुतळा तयार केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम होणार आहे. विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर, विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आर. अशोक, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते चलवादी नारायणस्वामी, खासदार जगदीश शेट्टर, विश्वेश्वर हेगडे-कागेरी, प्रियांका जारकीहोळी यांच्यासह खासदार, आमदार कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर सर्व आमदारांचे सामूहिक छायाचित्र या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ काढण्यात येणार आहे. एकंदरीत जय बापू, जय भीम, जय संविधान हे अधिवेशन एक ऐतिहासिक ठरणार आहे. यासाठी सीपीएड मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा नेत्यांच्या स्वागत कमानी व फलक उभारण्यात आले आहेत. तसेच काँग्रेस पक्षाचे ध्वजही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
गांधी भारत पुस्तकाचे प्रकाशन
या कार्यक्रमाचे औचित्य साधून माहिती आणि प्रसार खात्याच्यावतीने प्रकाशित केलेल्या 1924 च्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महात्मा गांधीजींचे भाषण आणि ठराव असलेल्या कन्नड आणि इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे.
अंगणवाड्या-शाळांना आज सुटी
सुवर्णविधानसौधच्या आवारात होणारे महात्मा गांधी पुतळ्याचे अनावरण व त्यानंतर सीपीएड मैदानावर होणाऱ्या ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार बेळगाव शहर व तालुक्यातील अंगणवाड्या व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमात लाखो लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांच्या हिताच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 अन्वये बेळगाव तालुका व शहरातील सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा व अंगणवाड्यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे.