जयानंद मठकर व्याख्यानमालेत आज रमेश वरखेडे, सदानंद मोरे
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिरतर्फे सुरु असलेल्या जयानंद मठकर व्याख्यानमालेत गुरुवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकचे माजी संचालक डॉ. रमेश वरखेडे यांचे सायबर संस्कृती आणि समकाल या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर या व्याख्यानाला लेखक, कवी, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डाॅ सदानंद मोरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. आजकल आपण सारेच या ना त्या प्रकारे सायबर विश्वाशी संबंधित आहोत. काय असतं हे सायबर विश्व? ते कुणी निर्माण केले? त्याचे फायदे तोटे काय आहेत? सायबर विश्व कसं कार्यरत असतं? सायबर संस्कृती म्हणजे काय? आपल्या दैनंदिन जीवनाला ती कशी प्रभावित करत असते? सायबर गुन्हेगारी म्हणजे काय? या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या उत्तरांसाठी या व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, सचिव रमेश बोन्द्रे, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर आणि प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले आहे.