आज केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर सेवानिवृत्ती सोहळा
आज माडखोल येथे गौरव सोहळ्याचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
माडखोल केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर हे आपल्या ३७ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर आज बुधवारी ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त दुपारी २:३० वाजता माडखोल केंद्र शाळेत त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कथामालेचे आणि कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माडखोल केंद्राचे केंद्रप्रमुख आणि जी. टी. गावकर सेवामयी पुरस्कारप्राप्त रामचंद्र वालावलकर म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा झरा सर्वांना हसत- खेळत ठेवण्याची आपली जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतात. सर्व कार्यक्रमात आनंदाने सहभागी होणारे रामचंद्र वालावलकर हे एक आगळे- वेगळे व्यक्तिमत्व. ते केंद्रप्रमुख झाल्यावर केंद्रप्रमुखांच्या कामामुळे व स्थानामुळे त्याचे व्यक्तिमत्व दडपून जाईल असे वाटतानाच या सर्वांवर मात करून मुलांमध्ये मिसळून कथामालेचे खरे वारसदार म्हणून त्यानी आपला एक वेगळा ठसा कथा मालेच्या परिवारात उठविला. शिक्षण विभाग सावंतवाडीमध्ये त्यानी आपली एक आगळीवेगळी प्रतिमा निर्माण केली. ही अभिमानाची बाब असून त्यांना आशासारखी सहधर्मचारिणी लाभली असल्यामुळे त्याचे कार्य अधिक सुखकर व सुलभ झाले . सेवानिवृत्त ही त्याची सेवापूर्ती नसून साने गुरुजी कथामालेच्या दालनात नव्या जोमाने नव्या उत्साहाने घेतलेली एन्ट्री ठरणार आहे. शिक्षक ते केंद्रप्रमुख हे शालेय शैक्षणिक प्रशासन करत असताना आपल्या सहकाऱ्यांना, समोरील विद्यार्थ्यांना कसं हसतमुख ठेवता येईल आणि आनंददायी पद्धतीने त्यांना कसं रममाण करता येईल.यासाठी ते नेहमी झटत राहतात. एका उत्कृष्ट, शैक्षणिक प्रशासकाच्या जबाबदाऱ्या केंद्रप्रमुख म्हणून वालावलकर सर लिलया पेलत असतात. अनेक केंद्रप्रमुखांमध्ये वालावलकर सर हे आदर्श केंद्रप्रमुख आहेत. शाळाशाळांमध्ये परिपाठाच्या वेळेला जाऊन प्रार्थना शिकवणे असेल, एखादं समूहगीत शिकवणे, वर्गामध्ये एखादं गीत शिकवणे, आनंददायी पद्धतीने अंक लेखन शिकवणे, अंक वाचन शिकवणे, प्रत्यक्ष पाठ घेऊन एखादी माहिती शिक्षकांना सांगणे इत्यादी अनेक चांगली कौशल्य सरांकडे आहेत. शाळा शाळा मधील वातावरण आनंददायी करणे आणि मार्गदर्शन करणे हे काम करताना ते सातत्याने दिसत असतात. गायन करणे आणि ते सुद्धा हार्मोनियम वाजवून गायन करणे यात ते निष्णात आहेत. साहित्य क्षेत्रातील त्यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे. क्षणात कधी ते कवी होतील, कधी ते लेखक होतील कधी ते शिक्षक होतील, कधी मुख्याध्यापक होतील, कधी केंद्रप्रमुख होतील आणि कधी डान्सर होतील तर कधी एखाद्या राजाच्या भूमिकेत शिरतील.वालावलकर सर आनंदी जीवन जगत आहेतच पण त्यांच्यामुळे इतर त्यांचे सहकारी सुद्धा आनंदी जीवनाकडे वळत आहेत. मुलांमध्ये कसं मिसळावं वर्गातील वातावरण कसं बदलावं आणि ते आनंददायी कसं करावं हे वालावलकर सरांकडून शिकावं. एखादं काम होण्यासाठी, एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी त्याचा पाठपुरावा कसा करावा हे त्यांच्याकडूनच शिकावे. त्यांचे शाळाशाळामधील आनंददायी अध्यापनाचे व्हिडिओ महाराष्ट्रभर पसरत आहेत. त्यांचा मित्रपरिवार ही मोठा आहे. वालावलकर सर त्यांच्या भागांमध्ये शिक्षकांना, मुलांना आणि पालकांना सुद्धा प्रेरणा देताना दिसतात.वालावलकर सर आपलं काम प्रामाणिकपणे करत असल्याचे समाधान वाटते.. अगदी कमी कालावधीत रामचंद्र वालावलकर सर सावंतवाडीतील शिक्षकांच्या गळ्यामधील ताईत झाले आहेत त्याला कारण त्यांची आनंददायी विचारसरणी, त्यांची आनंददायी राहणी आणि त्यांचे आनंददायी वर्तन हेच आहे. त्यांची कडक शिस्त सुद्धा अनुभवता येते. जेवढे ते प्रेमळ आहेत, गोड बोलतात तेवढे एखाद्या चुकीच्या गोष्टीला कडक शिस्तीत सरळ करतात. वालावलकर सर चुकीच्या परिस्थितीत कडक शिक्षा करायला मागे पुढे बघत नाहीत सामाजिक, शैक्षणिक कामामध्ये नेहमीच आघाडीवर तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथामालाचे सच्चे कार्यकर्ते आहेत.