प्रधानमंत्री आवास सर्व्हेक्षण आज अंतिम मुदत
सांगली :
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ सुरु करण्याची घोषणा केली आहे. आवास प्लस सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले पंरतु सद्यस्थितीत पात्र असलेल्या कुटुंबांना घरकुलाची संधी मिळणार आहे. आवास योजनेमध्ये ग्रामसेवकांमार्फत आणि स्वतः नोंदणी करण्यासाठी आज शेवटची मुदत असल्याने पात्र कुटुंबांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
केंद्र सरकारने पुढील पाच वर्ष सन २०२४-२५ ते २०२८-२९ या कालावधीत आवास प्रधानमंत्री योजना-ग्रामीण टप्पा-२ सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यानुषंगाने सन २०१८ मध्ये झालेल्या आवास प्लस सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले पंरतु सद्यस्थितीत पात्र असलेले कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत नवीन नियमावलीनुसार सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हा तीन-चार चाकी वाहन असणारे कुटूंब तीन-चार चाकी कृषी उपकरण असणारे कुटुंब, ५० हजार किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहुन अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटुंब, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असलेले कुटुंब, कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा १५ हजारापेक्षा जास्त कमवत असलेले कुटुंब, आयकर, व्यावसायिक कर भरणारे कुटुंब, याशिवाय अडीच एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटुंब, पाच एकर पेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारे पात्र कुटुंबाचे सुधारीत नियमावलीनुसार आवास प्लस मोबाईल अॅपमध्ये सर्वेक्षकाची नोंदणी करण्यात येत असल्याचे ग्रामीण विकासच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी सांगितले.
- मोबाईलवरच सर्वेक्षण करा
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर सर्वेक्षण करू शकता. त्यासाठी तुम्हाला अॅप डाऊनलोड करावं लागेल. सर्वेक्षण करताना तुमच्याकडे आधार कार्ड आणि आधार क्रमांक आवश्यक आहे. अॅपमध्ये चेहरा ओळखून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते.