आज सूर्यदेवाचा उत्सव
पणजी : गोव्यात आज रथसप्तमी उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. अनेक मंदिरात आज विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तर घरोनघरी महिला तुळशी वृंदावनाच्या बाजूला सूर्य देवाची पूजा करणार आहेत. तिथेच दूध तांदळाची खीर सूर्याच्या उन्हात शिजवून ती प्रसाद म्हणून सुर्यदेवाला दाखविली जाणार आहे. गेले काही दिवस चालू असलेल्या मकर संक्रांति उत्सवाची सांगता आज रथसप्तमी उत्सवाने होते. आजपासून वसंत ऋतूला प्रारंभ झाला, असे मानले जाते. सूर्यदेव आज सात घोड्यांवर बसून मार्गक्रमण करतात. आजपासून सूर्याचे तेज आणखी प्रखर होते. गोव्यातील काही मंदिरांमध्ये रथसप्तमी निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. डिचोली तालुक्यातील हातुर्ली मठामध्ये असंख्या भक्तमंडळ उपस्थितीत ब्रम्हेशानंद स्वामी महाराज रथसप्तमी उत्सव साजरा करतात. पणजीतील महालक्ष्मी मंदिरात आज हा उत्सव विशेष पद्धतीने साजरा केला जाणार असून त्यानिमित्त रथातून महालक्ष्मीच्या उत्सव मूर्तींची मिरवणूक काढली जाणार आहे.