For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोतिबा देवाची आज चैत्र यात्रा

11:31 AM Apr 12, 2025 IST | Radhika Patil
जोतिबा देवाची आज चैत्र यात्रा
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गोवा, गुजरात राज्याचे कुलदैवत व आराध्य दैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची मुख्य चैत्र यात्रा शनिवार, 12 एप्रिल रोजी होत आहे. देवस्थान व्यवस्थापन समिती प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

जोतिबा डोंगरावर शुक्रवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मंदिर परिसरात व दर्शन मंडपात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तर मुख्य यात्रेसाठी थांबलेल्या भाविकांनी यमाई मंदिर, दक्षिण दरवाजा परिसर, चव्हाण तळ परिसर व डोंगर परिसरात जागा मिळेल तेथे सासनकाठ्यांसह मुक्काम ठोकला आहे. डोंगरावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. भाविकांसाठी पाणपोई, आरोग्य सेवा, अन्नछत्र, शौचालय आदी सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी भव्य पार्किंग व्यवस्था केली आहे. डोंगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मंदिरात मोठ्या जनरेटरची सुविधा केली आहे. थेट प्रक्षेपणासाठी कॅमेरे व क्रीन बसवलेले आहेत.

Advertisement

दरम्यान जोतिबा यात्रेसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब पवार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, कोडोलीचे सपोनि कैलाश कोडग, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, जोतिबा देवस्थानचे इन्चार्ज ऑफिसर धैर्यशील तिवले, जोतिबा देवाचे पुजारी समिती यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्री यात्रेचे नियोजन व बंदोबस्त ठेवला आहे. भाविकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, धार्मिक संस्था सज्ज आहेत.

राज्य परिवहन महामंडळाने दहा मिनिटाला एक बस अशी व्यवस्था कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून केली आहे. यासाठी दोनशे बसेसची सोय केली आहे. जोतिबा बसस्थानक, रेल्वे स्टेशन, टाऊन हॉल, पंचगंगा नदी बसस्थानक ते जोतिबा असा प्रवास एसटीचा असेल. यात्रेसाठी चव्हाण तळ्dयाजवळ बसस्थानकाची सोय केली आहे. सासनकाठी मार्ग मंदिरातून उत्तर दरवाजातून यमाईकडे एकेरी मार्ग असेल. या मार्गातून सासनकाठी सोहळा व पालखी सोहळा निघेल. तर शिवाजी पुतळा मार्गे दर्शन मंडपातून मंदिरात प्रवेश असेल. चैत्र यात्रेदिवशी जोतिबावर येण्यासाठी केर्ली मार्गे जोतिबा वाहतूक मार्ग असेल तर परतण्यासाठी जोतिबा- दाणेवाडी-वाघबीळ मार्गे जाता येईल. भाविकांना श्रींचे दर्शन घेण्यासाठी यंदा नवीन बांधलेल्या दर्शन मंडपातून प्रवेश दिला जाणार आहे.

जोतिबाची शुक्रवारी सुवर्णालंकारित खडी, राजेशाही रुपातील आकर्षक महापूजा बांधण्यात आली होती. ही महापुजा श्रींचे पुजारी, साहिल बुने, उत्तम भिवदर्णे, बाळासो सांगळे, राजाराम बनकर, अक्षय ठाकरे, महालिंग शिंगे, महादेव झुगर, विकास ठाकरे, आनंदा बुने यांनी बांधली होती.

  • आज मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम

शनिवारी पहाटे तीन वाजता महाघंटेचा निनाद करून, चैत्र यात्रा सोहळ्dयास प्रारंभ होईल. पहाटे 4 वाजता श्रींची पाद्यपूजा व काकड आरती करण्यात येईल. त्यानंतर मुखमार्जन करण्यात येईल. पहाटे 5 ते 6 वाजता पन्हाळा तहसीलदारांच्या हस्ते श्री जोतिबा देवास शासकीय महाअभिषेक करण्यात येईल. त्यानंतर श्री जोतिबाची दख्खनच्या राजाच्या रूपातील सुवर्णालंकारित आकर्षक महापूजा बांधण्यात येईल. श्री बरोबर नंदी, महादेव, चोपडाई, रामलिंग, दत्त, काळभैरव देवांना महाभिषेक व पोषाख घालून सुवर्ण अलंकार महापूजा बांधण्यात येईल. त्यानंतर 10 वाजता धुपारती सोहळा होईल. यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीस दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन करुन प्रारंभ होईल. प्रथम मान असणाऱ्या सातारा जिह्यातील निनाम पाडळी सासनकाठीच्या पूजनानंतर मिरवणुकीस सुरुवात होईल. त्यानंतर मौजे विटे (ता. पाटण), कसबे डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (सातारा), कवठेएकंद (सांगली), कोल्हापूर छत्रपती अशा क्रमाने सासनकाठ्या सोडण्यात येणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजता तोफेची सलामी देऊन भव्य पालखी सोहळा मिरवणूक जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे निघेल. यमाई मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर परत हा पालखी सोहळा जोतिबा मंदिराकडे येईल. या ठिकाणी मंदिर प्रदक्षिणा घालून पालखी सदरेवर विराजमान होईल. त्यानंतर धार्मिक विधी, मानपान, डवरी गीते यांचे झुलवे झाल्यानंतर तोफेची सलामी देऊन हा पालखी सोहळा मंदिरात नेला जाईल. यानंतर मुख्य चैत्र यात्रा सोहळ्dयाची सांगता होईल

Advertisement
Tags :

.