For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकरी आंदोलकांचा आज ‘काळा दिवस’

07:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेतकरी आंदोलकांचा आज ‘काळा दिवस’
Advertisement

संयुक्त किसान मोर्चाची घोषणा : 26 फेब्रुवारीला ट्रॅक्टर रॅली, 14 मार्चला महापंचायत

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली, चंदीगढ

आंदोलक शेतकरी पुन्हा एकदा संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. शंभू सीमेवर एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यूबद्दल संताप व्यक्त करत संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) आज म्हणजेच 23 जानेवारी हा दिवस देशात ‘काळा दिवस’ पाळण्याची घोषणा केली आहे. तसेच भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनीही 26 फेब्रुवारीला देशभरात ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली आहे. तर, 14 मार्चला दिल्लीतील रामलीला मैदानावर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची महापंचायत आमंत्रित केली आहे. यासंदर्भात आगामी रणनीती ठरविण्यासाठी सहा सदस्यीय समन्वय समिती स्थापन केली आहे.

Advertisement

पंजाब-हरियाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गुऊवारी (22 फेब्रुवारी) दहावा दिवस होता. आंदोलनाच्या नवव्या दिवशी शेतकरी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षा एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत दु:खद घटना घडली. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे वय अवघे 21 वर्षे होते. या दु:खद घटनेनंतर संयुक्त किसान मोर्चाने 23 फेब्रुवारी हा काळा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि गृहमंत्री अनिल विज यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात येणार आहे.

पंजाबमधील भटिंडा येथील तरुण शेतकरी शुभकरण सिंग याचा बुधवारी शंभू सीमेवर मृत्यू झाल्यानंतर शेतकरी संघटना संतप्त झाल्या आहेत. गुरुवारी पंजाबमध्ये ठिकठिकाणी लोकांनी रास्तारोको करून निदर्शने केली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पुढील चर्चा चाल ठेवण्यासाठी बुधवारी बैठकीचे पाचवे निमंत्रण शेतकरी संघटनांना दिले होते. त्यानंतर शेतकरी संघटनांनी दोन दिवस आंदोलन स्थगित केले. सध्या वातावरण शांत असले तरी ‘दिल्ली चलो’च्या पवित्र्यावर शेतकरी संघटना ठाम असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे. युनायटेड किसान मोर्चासोबत केलेल्या कराराची अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरत असल्यामुळे आंदोलने हिंसक होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रामलीला मैदानात होणार शेतकऱ्यांची महापंचायत

खनौरी सीमेवर घडलेल्या प्रकाराचा आम्ही निषेध करतो, असे शेतकरी नेते म्हणाले. या निषेधाचाच एक भाग म्हणून 26 मार्चला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच 14 मार्च रोजी रामलीला मैदानावर देशभरातील शेतकरी महापंचायत घेणार आहेत. गुरुवारी महामार्गांवर निदर्शने करण्यात आली. या निदर्शनादरम्यान दिल्लीच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली होती. तसेच मुस्तफाबाद रेल्वे स्थानकावर शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केले. यावेळी वृद्ध, लहान मुले, महिलाही रेल्वे ऊळावर बसलेले दिसून आले.

दिल्लीला  चारही बाजूंनी घेरणार : राकेश टिकैत

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गुरुवारी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. हा लढा लांबचा आहे. हा केवळ एका आघाडीचा नाही. आता दिल्लीला चारही बाजूंनी वेढा घातला  जाईल. सर्व शेतकऱ्यांनी एकजूट राहिली पाहिजे. एकट्याने लढू नये, नफा-तोटा असेल तर तो सर्वांचाच होतो’ असे त्यांनी स्पष्ट केले.

पंजाब सरकारने भूमिका स्पष्ट करावी : पंढेर

शेतकऱ्यांनी पंजाब सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. हरियाणा पोलीस आणि निमलष्करी दल पंजाबमध्ये कसे घुसले असा सवाल त्यांनी केला आहे. शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर म्हणाले की, केंद्राने आमच्या भागात घुसून हल्ला केला, आमच्या वाहनांची तोडफोड केली, त्यामुळे पंजाब सरकारने त्यांच्याविऊद्ध कलम 302 नुसार गुन्हा दाखल करावा. पंजाब सरकारने आमच्या ‘लंगर’ आणि निषेधाच्या ठिकाणी येणारी वाहने रोखल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत असा दावा करतानाच पंजाब सरकारने शेतकऱ्यांबाबतची नेमकी भूमिका स्पष्ट करावी, असे पंढेर यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींकडून सहानुभूती व्यक्त

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करताना ‘जर शेतकरी एमएसपी मागतात, तर त्यांना गोळ्या घातल्या जातात. ही लोकशाहीची माता आहे का?’ असा प्रश्न करत मोदीजी, तुम्ही लोकशाहीची हत्या केली आहे हे जनतेला माहीत आहे आणि जनता उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement
Tags :

.