आज कुणकेरी श्री देवी भावईचा वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे | प्रतिनिधी
कुणकेरी गावचे ग्रामदैवत श्री देवी भावईचा वार्षिक जत्रोत्सव आज गुरुवारी १३ नोव्हेंबरला होत आहे. यानिमित्त या भावईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होणार आहे.यानिमित्त सकाळपासुन मंदिरात ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ३ वाजता गावपंच, मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत श्री देवी भावईचे घराकडुन वाजतगाजत श्रीच्या पालखीचे श्री देवी भावई मंदिराकडे आगमन होणार आहे. रात्री ११ वाजता ढोलताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, गावपंच, मानकरी, ग्रामस्थ, भाविक यांच्या उपस्थितीत तरंग-काठी, अब्दागिर, निशाणासह मंदिराभोवती श्रीच्या पालखी प्रदक्षिणा होणार आहे.त्यानंतर रात्री १२ वाजता आरोलकर पारंपारिक दशावतार नाटयमंडळ (आरवली) यांचे दशावतारी नाटक होणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी ६ वाजता मंदिरात गावपंच, मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत गाडगे फोडुन दहीकाला (जञौत्सव) संपन्न होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावपंच, मानकरी आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे.