आज फुकेरी श्री वैजा माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे प्रतिनिधी
दुर्गमस्थानी असलेल्या फुकेरी गावचे ग्रामदैवत श्री वैजा माऊली देवस्थानचा वार्षिक आज मंगळवार होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी वैजा माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होणार आहे.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कुळ घराकडून सवाद्य देवतांचे आगमन झाले. त्यानंतर देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात आले. यावेळी देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनास प्रारंभ झाला.यानिमित्त रात्री १० वाजता लोटांगण व सवाद्य पालखी मिरवणूक आणि पावणीचा कार्यक्रम होणार आहे. रात्री उशिरा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. बुधवारी सकाळी लघुरुद्र, अभिषेक तर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या जत्रोत्सवासाठी बांदा बसस्थानकातून भाविकांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात येणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी आणि फुकेरी ग्रामस्थांनी केले आहे.