आज भालावल देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव
ओटवणे | प्रतिनिधी
भालावल गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव आज रविवारी २३ नोव्हेंबर रोजी होत आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी महती असलेल्या सातेरीच्या वार्षिक उत्सवात हजारो भाविक नतमस्तक होतात.यानिमित्त सकाळी मंदिरात पुजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कुळघराकडून तरंग काठीचे सवाद्य मिरवणूकीचे मंदिरात आगमन झाले. त्यानंतर सातेरीला भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आल्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालुन देवीची मानाची ओटी भरण्यात आली. त्यानंतर देवीच्या दर्शनास प्रारंभ झाला. रात्री उशिरा सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर शरद मोचेमाडकर प्रस्तुत जय हनुमान दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे सर्व मानकरी आणि भालावल ग्रामस्थांनी केले आहे.