दै. तरुण भारत सिंधुदुर्गचा आज ४२ वा वर्धापन दिन
सावंतवाडी :प्रतिनिधी
दैनिक तरुण भारत संवादच्या सिंधुदुर्ग आवृत्तीचा 42 वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार 9 जानेवारी रोजी सावंतवाडी येथे साजरा होत आहे. सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४. ३० वाजता वर्धापन दिन कार्यक्रमास सावंतवाडी मांगिरीश बँक्वेट हॉल, खासकिलवाडा येथे वर्धापन दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत जनरेशन झेड विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. मुख्य वर्धापन दिन कार्यक्रमास राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, तरुण भारत संवादचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर, संचालक सई ठाकूर बिजलानी, तसेच सिंधुदुर्गातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दैनिक तरुण भारत संवादने नेहमीच आपली लेखणी धारधार आणि अन्यायाविरुद्ध चालवली आहे. जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात दैनिक तरुण भारतचे मोठे योगदान आहे. नागरी भागासह ग्रामीण भागातील वाचकांचा विश्वास तरुण भारतने संपादित केला आहे.