आज 39 वा गोवा राज्य दिन
पुस्तके-वेब सिरीजचा शुभारंभ, छायाचित्र प्रदर्शन, सत्कार, पुरस्कार वितरण
पणजी : 39 वा गोवा घटक राज्य दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम आज शुक्रवार 30 मे रोजी सकाळी 11 वा. पणजीतील कला अकादमी येथील दीनानाथ मंगेशकर कला मंदिर येथे संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहसचिव श्रीमती अर्चना अवस्थी, आयआरएस आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. याप्रसंगी गोव्यातील प्रतिष्ठिताना राज्याच्या आर्थिक विकासात आणि गोव्याची ओळख जपण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाईल. बिगफूट-लोटली, कॅफे तातो-पणजी, गोमंत विद्या निकेतन-मडगाव, पॉल जॉन डिस्टिलरीज-कुंकळी, झांट्यो काजू-डिचोली, डांगी ऑप्टिशियन-म्हापसा, मावझो फोटो स्टुडिओ-मडगाव, डॉ. कार्मो ग्रासियास हॉस्पिटल-मडगाव, टिटोस-बागा आणि सागर नाईक मुळे, फोंडा यांचा समावेश आहे.
उल्हास न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रमांतर्गत गोवा पूर्णपणे साक्षर राज्य म्हणून घोषित केले जाईल आणि हा राज्यासाठी एक महत्त्वाचा क्षण असेल. ‘गोवा-पुर्वीचा आणि आताचा’ या काही दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. अभिलेख खात्याच्या ‘भारत है हम’ या वेब सिरीजचा शुभारंभ केला जाईल. गोव्यातील मंदिरे, ‘गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर’ आणि ‘विकास पथ: गोव्याची सुधारणा आणि नवीकरणाचा प्रवास’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन होईल. गृह खात्याच्या सीएफएफ आणि कार्मिक खात्याच्या अनुकंपा योजनेअंतर्गत प्रायोजक पत्रे वितरीत केली जातील. राज्याला स्वयंपूर्ण बनविण्याच्या प्रयत्नांसाठी स्वयंपूर्ण गावे आणि स्वयंपूर्ण मित्रांचा याप्रसंगी सत्कार केला जाईल.
प्रशासनातील सर्वोत्तम पद्धतींचे पालन केल्याबद्दल पाच सरकारी खात्यांना सन्मानित केले जाईल. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमावरील कामासाठी नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खाते, कचरा व्यवस्थापन उपक्रमांसाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ, अपंग व्यक्तींशी संबंधित त्यांच्या एकूण कामासाठी अपंग व्यक्तींसाठी सक्षमीकरण खाते, स्वयं-मदत गटांच्या सक्रीय सहभाग आणि सुधारणांसाठी काम केल्याबद्दल ग्रामीण विकास खाते आणि जॉगर्स पार्क जवळील चिखली येथील कचरा उपक्रमासाठी पंचायत खाते यांचा समावेश आहे.
गोवेकरांची स्वतंत्र ओळख झाली : राज्यपाल
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना गोवा राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. घटक राज्यामुळे गोव्यातील लोकांना त्यांचे योग्य व्यक्तिमत्व मिळाले आणि त्यांचे स्वत:चे भविष्य घडविण्याची संधी मिळाली. या ऐतिहासिक कामगिरीत योगदान देणाऱ्या नेत्यांचे, तज्ञ आणि नागरिकांचे कृतज्ञतेने आपण स्मरण करूया. आज गोवा हे एक आधुनिक, भविष्यवादी राज्य आहे. गोव्यातील लोक त्यांच्या प्रगतीशील मूल्यांसाठी आणि आदरातिथ्यासाठी ओळखले जातात. राज्याच्या नैसर्गिक सौंदर्यासह गोवा एक अव्वल पर्यटनस्थळ बनले आहे. समुद्रकिनारे, प्रार्थनास्थळे आणि स्थापत्य वारशासाठी प्रसिद्ध आहे, समृद्ध जैवविविधतेने गोवा समृद्ध आहे आणि या जैवविविधतेला जागतिक ओळख लाभली आहे, असे राज्यपालांनी आपले शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
विकसित भारत, विकसित गोवा साकारुया : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. घटक राज्यामुळे गोव्याला वेगळे व्यक्तिमत्व मिळाले. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी गोव्यातील नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि लोकांनी खूप प्रयत्न केले. या दिवशी गोव्याच्या स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या प्राणांची आहुती दिलेल्यांच्या बलिदानाचे स्मरण करतात आणि त्यांचा आदर करतात. गोवा राज्याने विकासाच्या विविध क्षेत्रात प्रशंसनीय प्रगती साधली आहे. स्वयंपूर्ण गोवा बनविण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम चालीस लावले आहेत. विकसित गोवा विकसित भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी आजच्या प्रसंगी एकत्रित प्रयत्न करुया, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.