शहरात आज कार्तिक एकादशी
विविध कार्यक्रमांची रेलचेल : उपवासाच्या पदार्थांना मागणी
बेळगाव : शहर परिसरात मंगळवारी कार्तिक एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडी, प्रवचन, भजन व कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. विशेषत: विठ्ठल मंदिरांतून टाळ-मृदंगांचा गजर पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकादशीच्या निमित्ताने पहाटे काकड आरती, अभिषेक, पूजा, भजन, आरती तर रात्री जागर भजन व कीर्तन सोहळा होणार आहे. काही मंदिरांतून पारंपरिक पद्धतीने दिंडी काढली जाणार आहे. शहरातील विठ्ठल मंदिरे भक्तांनी फुलणार आहेत. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढणार आहे. एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाजारात उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली होती. यामध्ये साबु, वरीचे तांदुळ, राजगिरा लाडू, केळी, फळांची अधिक खरेदी झाली. वारकऱ्यांकडून एकादशीसाठी उपवास केला जातो. या पार्श्वभूमीवर या पदार्थांची खरेदी झाली.