आज गणेश जयंती
कोल्हापूर :
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीच्या औचित्यावर शनिवार 1 रोजी शहर व परिसरातील सर्वच गणेश मंदिरांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांनी गणेश जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त दुपारी 12 ते पुढील 20 मिनिटांच्या कालावधीत मंदिरांमध्ये गणेश जन्मकाळ सोहळा व महाआरती करण्यात येईल. तसेच जयंतीच्या पार्श्वभूमीवर सकाळी 6 ते दुपारपर्यंतच्या कालावधीत गणेशमूर्तीला महाअभिषेक, गणेशयाग, किर्तन, भजन, होमहवन, प्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रमसुद्धा करण्यात येणार आहेत. याचबरोबर शुक्रवार पेठेतील शिवगणेश मंदिर व न्यू शिवनेरी तऊण मंडळ आणि शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिराच्या वतीने सायंकाळी गणपतीचा पालखी सोहळा साजरा केला जाणार आहे.
दरम्यान, सोळा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गणपतीच्या जयंतीनिमित्त ओढ्यावरील सिद्धीविनायक मंदिर, पाचगावातील खडीचा गणपती मंदिर, रंकाळा टॉवरवरील जाऊळाचा गणपती मंदिर, लक्ष्मीपुरीतील स्वयंभू गणेश मंदिर, संभाजीनगर रोडवरील रेसकोर्स गणेश मंदिरासह शिवाजी पेठ, शुक्रवार पेठ, भाऊसिंगजी रोड, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, ताराबाई पार्क, पायमल वसाहत (सम्राटनगर), शाहूनगर, आपटेनगर यासह शहरातील सर्वच लहान-मोठ्या गणेश मंदिरांना रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. जयंती सोहळ्याच्या वातावरण निर्मितीसाठी तर गेल्या चार दिवसांपासून अनेक गणेश मंदिरांमध्ये अथर्वशिर्ष पठण, भजन, पारायण, किर्तनासह भाव व भक्तीगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 1 व रविवार 2 रोजी भाविकांसाठी महाप्रसादाचेसुद्धा आयोजन केले आहे. दिवसभर गणपतीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक विक्रेत्यांनी गणेश मंदिरांजवळ दुर्वा, केळी, पेढ्यांसह विविध प्रकारच्या विधी साहित्य विक्रीचे स्टॉल उभारले आहेत.
- आज , उद्या ठिकठिकाणी महाप्रसाद...
जुनी मोरे कॉलनीतील तपोवन गणेश मंदिरासह संभाजीनगर पेट्रोल पंपाजवळील सिंहासन तऊण मंडळ, पायमल वसाहत (सम्राटनगर) येथील गणेश मंदिर यांच्या वतीने शनिवार 1 रोजी महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. तसेच ओढ्यावरील सिद्धीविनायक मंदिर, संभाजीनगर रोडवरील रेसकोर्स गणेश मंदिर, शुक्रवार पेठेतील शिवगणेश मंदिर, शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिर, बालगोपाल तालीम मंडळाजवळील गणेश मंदिर यांच्या वतीने रविवार 2 रोजी महाप्रसाद करण्यात येणार आहे.