आज गणेशजयंती पर्व
गावोगावच्या मंदिरांत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन : सकाळी 11. 39 वाजता सुरु होणार धार्मिक विधी
पणजी : विनायक चतुर्थी, तिलपुंद चतुर्थी, वरद चतुर्थी, अशा विविध नावांनी ओळख असलेली माघी श्रीगणेश जयंती आज देशभरात साजरी होत आहे. अष्टविनायक मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही श्रीगणेशाची अनेक मंदिरे असून त्या प्रत्येक ठिकाणी आज श्रीगणेश जयंती मोठ्या भक्तीभावाने, उत्साहात साजरी होणार आहे. हिंदू धर्मात श्रीगणेशाला विशेष स्थान आहे. प्रत्येक मंगल कार्यारंभी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. हिंदू पंचागानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशजयंती साजरी करण्यात येते. तिला माघी गणेश जयंती असेही म्हणतात. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आज दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजून 39 मिनिटांपासून प्रारंभ होत आहे. उद्या दि. 2 रोजी सकाळी 9 वाजून 14 मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे. या काळात भगवान श्रीगणेशाची विधीवत पूजा केली जाईल.
गोव्यातील काही प्रमुख मंदिरांपैकी फोंडा तालुक्यात फर्मागुडी येथील श्रीगोपाळ गणपती, खांडोळा माशेल येथील श्रीमहागणपती, बेतोडा येथील श्रीगणेश मंदिर, डिचोली तालुक्यात कुंभारवाडा चावडी पाळी येथील श्रीमहागणपती, तसेच वेळगे आणि तळेवाडा पाळी येथील गणेश मंदिरे, पणजीत सांत इनेज येथील श्रीआप्टेश्वर सिद्धीविनायक मंदिर, कांपाल येथील बालगणेश मंदिर, बोक द व्हाक येथील महालक्ष्मी मंदिर प्रकारातील श्रीगणेश मंदिर, आल्तिनो येथील गणपती मंदिर, भाटले सटी भवानी मंदिर प्राकारातील श्रीगणेश मंदिर, उत्तर गोव्यात कांदोळी येथील सिद्धीविनायक मंदिर, त्याशिवाय वास्को आणि राज्याच्या अन्य भागातील मंदिरांचा समावेश आहे. या सर्व मंदिरांमध्ये आज सकाळी 11 वाजून 39 मिनिटांपासून अभिषेकादी विविध धार्मिक विधी प्रारंभ होणार आहेत. आजच्या या पवित्र दिनी बहुतेक लोक उपवास करतात. दिवसभर श्रीगणेशाच्या विविध मंत्रांचा जप करतात. त्यात प्रामुख्याने ‘ॐ गं गणपतये नम:’ या सर्वात सोप्या तरीही सर्वात प्रभावी मंत्राचा समावेश असतो.
ऑनलाईन शुभेच्छांचा वर्षाव सुरु
आजच्या मोबाईलच्या जमान्यात लोक प्रत्यक्षात एकमेकांना भेटणे शक्य नसले तरीही वॉटस्अॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम आदी माध्यमातून आपल्या प्रियजनांना सुंदर शुभेच्छा, शुभेच्छापत्रे पाठवून या सणाचा उत्साह वाढवत असतात. आज माघी गणेश जयंतीच्या मंगलमय दिनीही भक्तगण एकमेकांवर अशा ऑनलाईन शुभेच्छांचा वर्षाव करणार आहेत.