अजि मी ब्रह्म पाहिले
अध्याय नववा
साक्षी मी प्रकृती-द्वारा उभारी सचराचर। त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होतसे ।। 10 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार भगवंतांच्या अनुमतीने माया चराचर जगाची निर्मिती व नाश करते. ते केवळ ह्या घटनेचा साक्षी असतात. त्यांनी मायेचा अंगीकार केला म्हणून ते चराचरांच्या उत्पत्तीला निमित्त आहेत, असे समजले तर प्राणीमात्र त्यांच्यात होते असे म्हणता येईल किंवा असेही म्हणता येईल की, माया भूतांची निर्मिती करते म्हणजे त्यांचा त्याच्याशी काही संबंध नसल्याने ते त्यांच्यात नाहीत. थोडक्यात दोन्ही दृष्टीने विचार केला तर ते प्राण्यात नसतात ही गोष्ट सत्य आहे. भगवंत अर्जुनाला पुढे म्हणाले, आता इंद्रियांवर संयम करून त्यांना स्वत:च्या ताब्यात ठेव आणि बाह्य गोष्टींकडे दुर्लक्ष करून अंतर्मुख हो आणि मी सांगितलेल्या गुह्य विचारांचा अनुभव घे. अर्जुना, अंतर्मुख होणे जोपर्यंत जमणार नाही, तोपर्यंत माझी स्वरूपस्थिती अनुभवास येणार नाही. तसे पाहिले असता तर्काने माझी स्वरूपस्थिती कळल्यासारखी वाटते पण ते खोटे असते. काही लोक मला सगुणरुपात पाहतात आणि त्यावरून माझ्या निर्गुण रुपाची कल्पना करतात आणि आम्हाला ईश्वराची स्वरूपस्थिती समजली आहे, असे म्हणतात ते खरे नाही कारण ज्याला ती उमजते तो ती उमजल्या उमजल्याच तो ईश्वरात मिसळून जाऊन त्याच्याशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे तो माझे स्वरूप सांगायला अस्तित्वातच नसल्याने शब्दात कसे सांगणार? हे शब्दात सांगणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा अनेक अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतील. उदाहरणार्थ मृगजलाच्या ओलाव्याने जमीन भिजेल किंवा जाळे पाण्यात पसरल्यावर त्यात चंद्रबिंब सापडेल. थोडक्यात संभाषण कलेच्या जोरावर कित्येकजण स्वरूपस्थितीबद्दल खात्रीपूर्वक सांगत असले तरी ती त्यांनी केलेली स्वत:ची फसवणूक असते. तेव्हा जर कुणी आम्ही ब्रह्म पाहिले आहे, त्याला जाणले आहे असे म्हणू लागले तर ओळख की, तो निखालस खोटे बोलत आहे.
श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, परमेश्वराचे मूळ स्वरूप निर्गुण, निराकार आहे पण निर्गुणाला आकार नसल्याने त्याची उपासना करता येत नाही. म्हणून उपनिषदात ऋषीमुनींनी अंतरज्ञानाने निर्गुण काय आहे ह्याचा आराखडा काढून दिला आणि संतांनी त्यात रंग भरून ईश्वराची सगुण मूर्ती आपल्या डोळ्यापुढे उभी केली. म्हणून निर्गुण काय आहे हे लक्षात घ्यावे परंतु उपासना मात्र सगुणाची करावी. अजि मी ब्रह्म पाहिले हा अमृतराय महाराजांचा अभंग हेच सांगतो. तेही ब्रह्म पाहिल्याचे सांगतात पण कसे? तर सगुण रुपात, निरनिराळ्या भक्तांची सेवा करण्यात मग्न असलेल्या विठुरायाच्या दर्शनात ते ब्रह्म पाहतात. ते म्हणतात, अजि मी ब्रह्म पाहिले, अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी, कटिकर, नटसम, चरण विटेवरी, उभे राहिले । एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी । खांदी कावड, आवड मोठी, पाणी वाहिले । चोख्यासंगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्वता । जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले । दामाजीची रसिद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरली । अमृतराय म्हणे ऐसी माऊली, संकटा वारिले.
क्रमश:
