श्री हरिमंदिर देवस्थानचा आज दिंडी उत्सव
मडगाव : मडगावच्या श्री हरिमंदिर देवस्थानचा प्रतिवार्षिक कार्तिकी महाएकादशीचा दिंडी उत्सव आज गुरुवार दि. 14 रोजी साजरा होत असून दिंडी उत्सवानिमित्त मठग्राम नगरी सजली आहे. आज सकाळपासून श्री हरिमंदिरात धार्मिक विधी तसेच सायंकाळी नामवंत गायकांच्या गायनाच्या बैठका होणार आहेत. आज सकाळी 7 वा. श्रींस महाअभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम, सकाळी 10 वा. सुरेंद्र शेणवी बोरकर (बोरी) व साथीकलाकारांचा भजनाचा कार्यक्रम, दुपारी 12.30 वा. श्रींची महाआरती व तद्नंतर महाप्रसाद (अन्नसंतर्पण), सायं. 5 वा. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील वारकरी संप्रदायांतर्फे भजनाचा कार्यक्रम, 6.15 वा. श्री माऊलीची धार्मिक ग्रंथासह श्रींच्या रथात स्थापना, 6.30 वा. श्री हरिमंदिरासमोरील व्यासपीठावर प्रमुख निमंत्रित गायक-वादक कलाकारांची ‘गाण्याची पहिली बैठक’ होईल. यात गोव्याची युवा प्रतिभावान गायिका मुग्धा गांवकर आणि पुणे येथील ईश्वर घोरपडे हे गायक कलाकार आपली कला सादर करतील.
रात्री 9 वा. सुप्रसिद्ध दिंडी आयोजक बाबू गडेकर संचालित श्री दामोदर बोगदेश्वर दिंडी पथक, वास्को आणि निमंत्रित वारकरी भजनी मंडळासह श्री विठ्ठल रखुमाई रथाचे श्री हरिमंदिर येथून प्रस्थान, रात्री 10.30 वा. युको बँक, न्यू मार्केट येथील व्यासपीठावर प्रमुख आमंत्रित गायक व वादक कलाकारांची गाण्याची दुसरी बैठक, त्यानंतर रात्री 11.30 वा. नगरपालिका चौकात गाण्याची तिसरी बैठक होईल. तद्नंतर श्रींच्या दिंडी रथाचे श्री राम मंदिर, श्री दामोदर साल व श्री विठ्ठल मंदिर येथे प्रस्थान होईल. शुक्रवार दि. 15 रोजी (कार्तिक शु. चतुर्दशी) दुपारी 1 वा. श्रींच्या दिंडी रथाचे श्री हरिमंदिरात आगमन व तद्नंतर ‘गोपाळकाला’, महाआरती, रात्री 8.15 वा. श्री हरिमंदिराच्या प्रांगणात खास गाण्याची बैठक होईल. त्यात गायक कलाकार विराज जोशी (पुणे, भारतरत्न कै. पंडित भीमसेन जोशी यांचे नातू) हे आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन डॉ. गोविंद भगत करतील. गायक कलाकारांना दयानिधेश कोसंबे, राया कोरगांवकर, दत्तराज शेट्यो, दत्तराज सुर्लकर, राहुल खांडोळकर, महेश धामस्कर व अभिजित एकावडे हे साथसंगत करणार आहेत.
‘दिंडी’ स्पर्धा ठरणार खास आकर्षण
श्री दामबाबाले घोडे कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित केली जाणारी दिंडी स्पर्धा यंदाही दिंडी महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. या दिंडी महोत्सवात यंदा शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मडगाव स्टेट बँकजवळ उभारण्यात येणाऱ्या दामबाब चौकात दिंडी पथकांचे रिंगण तसेच आकाशकंदील व फळे सजावट स्पर्धा होणार आहे. पारंपरिक व अत्याधुनिक आकाशकंदील हे या स्पर्धेचे वैशिष्ट्या असते.
सॉलिड पार्टीची ‘रांगोळी’ स्पर्धा
दिंडी महोत्सवानिमित्त दरवर्षी सॉलिड पार्टी ट्रस्टतर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत गोव्यातील रांगोळी कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करतात. त्याला उदंड असा प्रतिसाद मिळत असतो. रांगोळी स्पर्धेला सकाळी प्रारंभ होईल व संध्याकाळी सांगता होणार असून त्यानंतर रांगोळ्या लोकांना पाहण्यासाठी खुल्या केल्या जातील. ही स्पर्धा मडगाव पालिकेच्या आगाखान उद्यानात घेतले जाणार आहे.
कोंब परिसरात ‘स्वरदिंडी’
युव संजीवनीतर्फे कोंब-मडगाव येथे ‘स्वरदिंडी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात मुंबईचे अभिषेक तेलंग व पुणे येथील शमिका भिडे हे गायक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. हे दोन्ही युवा कलाकार झी मराठीच्या ‘सारेगमप’ कार्यक्रमात चमकले होते.