‘तंबाखू सेवन म्हणजेच अकाली मृत्यू’
आता तंबाखूजन्य उत्पादनांच्या पाकिटावर नवे बोधवाक्य : सरकारकडून नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, आता सिगारेट आणि इतर उत्पादनांच्या पॅकेटवर मोठय़ा अक्षरात “तंबाखू सेवन म्हणजेच अकाली मृत्यू’’ असे नवे बोधवाक्य ठळक अक्षरात लिहावे लागणार आहे. याशिवाय, पॅकेटच्या मागील बाजूस, काळय़ा चौकटीमध्ये “आजच सोडा, 1800-11-2356 वर कॉल करा’’ असेही पांढऱया अक्षरात लिहावे लागणार आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही प्रकारचे तंबाखू किंवा तत्सम तंबाखूजन्य पदार्थ अल्पवयीन व्यक्तीला विकणे हे बाल न्याय अधिनियम 2015 च्या कलम 77 चे उल्लंघन ठरणार आहे. या कायद्यांतर्गत आरोपीला सात वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेले सुधारित नियम 1 डिसेंबर 2022 पासून लागू होतील. यापूर्वी तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकेटवर ‘तंबाखू म्हणजेच वेदनादायक मृत्यू’ अशा आशयाचा संदेश लिहिला जात होता. आता डिसेंबरपासून त्यात बदल केला जाणार आहे.
तंबाखू सेवनामुळे दरवषी 80 लाख मृत्यू
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, तंबाखूच्या वापरामुळे जगात दरवषी सुमारे 80 लाख मृत्यू होतात. तंबाखूचा वापर थांबवण्यासाठी दरवषी 31 मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिन साजरा केला जातो. यादिवशी जगभरातील लोकांना तंबाखूच्या धोक्मयांबद्दल जागरुक केले जाते.