विश्वरूप पाहण्यासाठी ज्ञानदृष्टीची गरज असते
अध्याय आठवा
विभू म्हणजे सर्वव्यापी. या शब्दाच्या अर्थाप्रमाणे ईश्वराने सर्व विश्व व्यापलेलं आहेच तरीही माणूस ते सहजी मान्य करत नाही पण काही तीर्थक्षेत्री, काही व्यक्तींमध्ये ईश्वराचं अस्तित्व ठळकपणे जाणवतं आणि त्यांचं महात्म्य विभूतीमहात्म्य म्हणून मान्य करावं लागतं. उदाहरणार्थ नैसर्गिक आश्चर्ये, लोककल्याण करणारे संत महात्मे यांच्यातील विभूती स्पष्टपणे जाणवतात. नारद मुनींनी अशा कैक विभूती वरेण्यराजाला सांगितल्या होत्या. पण तेही शेवटी म्हणाले की, राजा मला माहित असलेल्या विभूती मी तुला सांगितल्या.
तरीही ईश्वर अनंत असल्याने विभूतीही अनंत आहेत. त्यामुळे मी तुला सांगितल्या त्याव्यतिरिक्त त्यांच्या अनेक विभूती असणार आहेत. तेव्हा ईश्वराची जेव्हा गाठ पडेल तेव्हा त्या तू त्याच्याकडून आवश्य जाणून घे. मुनींचं हे सांगणं लक्षात ठेवून राजानं बाप्पांना ज्यात बाप्पांच्या सर्व विभूतींचा समावेश असेल ते विश्वरूप दर्शन घडवण्याची गळ घातली. त्यासंबंधित असलेले ह्या अध्यायातील पहिले तीन श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार मोठमोठ्या ऋषीमुनींनी त्यांना विस्वरूप दाखवा अशी देवाकडे मागणी केली तर ती मान्य होतेच असं नाही. कारण ते करत असलेली साधना काही ना काही अपेक्षेने केलेली असते. यात त्यांची मी कर्ता आहे ही भावना प्रभावी असते. साधना करणारा आणि फळ देणारा वेगवेगळे असतात.
म्हणजे दोन व्यक्ती आल्या पण अनन्य भक्त मी नाही आणि तू आहेस या एकाच भावनेत असल्याने त्याने अद्वैत साधलेले असते. त्यामुळे अनन्य भक्ताच्यापुढं बाप्पांना काहीच सुचत नसल्याने बाप्पांनी राजाची मागणी लहान मुलाचे लाड माता ज्या सहजतेनं पुरवते, त्या सहजतेनं मान्य केलेली आहे. ते म्हणाले, अरे हे सर्व विश्व मीच व्यापलेलं असल्याने ते माझ्यातच सामावलेलं आहे. त्या सगळ्याचे दर्शन मी तुला आता घडवतो. हे माझे विश्वरूप दर्शन आत्तापर्यंत कुणीही पाहिलेलं नाही. त्यामुळे त्याचं वर्णन तुला कुणीही सांगू शकणार नाही.
अशी अनेक दिव्य म्हणजे अलौकिक आणि केवळ ईश्वरालाच घडवून आणणे शक्य असलेली आश्चर्ये मी तुला दाखवतो पण ह्यात एक अडचण आहे, ती म्हणजे माझे विश्वरूप माणसाच्या सामान्य डोळ्यांना दिसणे शक्य नाही. ज्यांनी ज्यांनी हे विश्वरूप जाणून घेतलेलं आहे त्यांना त्यांच्या निरपेक्ष भक्तीवर प्रसन्न होऊन देवाने ज्ञानदृष्टी दिलेली असते. राजा तुझ्या निरपेक्ष भक्तीवर मी प्रसन्न आहे म्हणून विश्वरूप पाहण्यासाठी आवश्यक असे ज्ञानचक्षु मी तुला देतो, असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
ज्ञानचक्षुरहं तेऽद्य सृजामि स्वप्रभावतऽ ।
चर्मचक्षुऽ कथं पश्येन्मां विभुं ह्यजमव्ययम् ।। 4 ।।
अर्थ-स्वप्रभावाने सर्वव्यापी, जन्मरहित व नाशरहित असलेल्या माझ्या स्वरूपाला तुझे चर्मचक्षु पाहू शकणार नसल्याने मी तुला ज्ञानचक्षु
देतो.
विवरण-ईश्वराचं विश्वरूप हे कायम अस्तित्वात असतं. ते परिपूर्ण असल्याने त्यात कमीही होत नाही आणि वाढही होत नाही. तसेच ते सर्वव्यापी असून अविनाशी आहे. त्याच्या अवाढव्य पसाऱ्यामुळे माणसाच्या डोळ्यात ते पहायची कुवत नसते. त्यासाठी दिव्यदृष्टीची, ज्ञानदृष्टीची गरज असते. म्हणून बाप्पा म्हणतायत, ते पाहण्यासाठी मी तुला ज्ञानदृष्टी देतो. भगवद्गीतेतल्या प्रसंगानुसार जेव्हा अर्जुनाने मला विश्वरूप दाखवा असा भगवंतांच्याकडे हट्ट धरला तेव्हा भगवंतांनी त्याचा तो हट्ट पुरवायला लगेच सुरवात केली पण अर्जुनाला त्याच्या सामान्य डोळ्यांनी काहीच दिसेना.
क्रमश: