महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भक्तांचे संकट हरण करणे हे तर श्रीकृष्णाचे ब्रीद आहे

06:33 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, शुकमुनी परीक्षित राजाला श्रीकृष्णमहात्म्य सांगत आहेत. ते अनेकदा ऐकलेले असले तरी त्याची गोडी अवीट असते. त्यात ते महिमान शुकमुनी सांगत आहेत म्हंटल्यावर दुधात साखर असे म्हणता येईल. त्या महिमानाच्या अवीट गोडीमुळे ते सांगणारे शुकमुनी आणि ऐकणारे श्रोते ह्यांना कधीही थकवा जाणवत नाही.

Advertisement

शुकमुनी म्हणाले, श्रीकृष्णनाथ त्यांनी केलेल्या सर्व कर्मात अलिप्त राहिले ह्यात विशेष ते काय? जो सृष्टीची निर्मिती करतो, पालन करतो आणि शेवटी संहार करतो आणि एव्हढे सगळे करूनही त्यापासून अलिप्त राहतो त्याला यदुवंशात जन्म घेऊन केलेल्या कर्मातून अलिप्त राहणे काय अशक्य आहे? विशेष म्हणजे, कुणाकडूनही कसल्याही मदतीची अपेक्षा न करता श्रीकृष्णनाथ सृष्टीची निर्मिती स्वत: करतात. तिचा प्रतिपाळ करून शेवटी संहारही करतात आणि हे सगळे करून ते स्वत: शिल्लक उरतात.

अशा प्रकारे सृष्टीची निर्मिती, प्रतिपाळ आणि संहार करणारे श्रीकृष्णनाथ त्या सृष्टीपासून अलिप्त असतात. जरी त्यांनी निर्माण केलेली सृष्टी समोर दिसत असली तरी ते अविकारी असल्याने, त्यांना प्रेम, लोभ, राग सुखदु:ख असे कोणतेही विकार स्पर्शसुद्धा करत नाहीत. सर्वांच्या अंतर्यामी श्रीकृष्णाचे वास्तव्य असते. त्यांच्याकडून जे जे कर्म घडते त्या सर्व कर्मांचे ते कर्ते असतात आणि सर्व कर्मे करून अकर्ते असतात. त्यामुळे त्यांना देही असून विदेही म्हणावे लागते.

असा अगाध श्रीकृष्ण महिमा शिव, शुक्र, ब्रह्मा ह्यापैकी कुणालाही जाणता आला नाही. त्यांचा देह हाच विदेहात्मा होता म्हंटलं तरी चालेल. त्यामुळे ते पाहता पाहता निजधामाला निघून गेले. ह्याच अवतारात श्रीकृष्णनाथांनी देही राहून विदेहीपणे कर्मे कशी करता येतात ते दाखवून दिले. त्याबद्दल राजा मी मागे तुला सांगितले आहेच. आता आणखी एकदा त्याची उजळणी करू. स्वत:च्या करंगळीवर त्यांनी सात दिवस गोवर्धन पर्वतासारखा महाकाय पर्वत तोलून धरला. त्यायोगे त्यांनी इंद्राचे गर्वहरण केले. देही असून विदेही असल्याचे ह्या उदाहरणातून त्यांनी दाखवून दिले. स्वत: दावाग्निचे प्रश्न करून हुताशनाला लाजवले. रासक्रीडा करून मदनाचा अभिमान घालवला. समुद्राला मागे सारून द्वारका हे स्वत:चे नगर वसवले. त्यातही विशेष म्हणजे मथुरेतील लोक झोपले होते त्यांची झोपमोड न होऊ देता त्यांच्या नकळत त्यांना द्वारकेत आणून वसवले. द्रौपदीच्या थाळीची गोष्ट तर प्रसिद्धच आहे. पांडवांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना चमत्कारिक थाळी दिली.

ऐनवेळी ऋषीवर येऊन भोजनाची मागणी करू लागले म्हंटल्यावर द्रौपदीच्या हाकेला ओ देऊन तेथे प्रकट झाले आणि त्या थाळीला चिकटलेले भाजीचे पान खाल्ले. त्याबरोबर चमत्कार झाल्याप्रमाणे ऋषीवर तृप्त होऊन ढेकर देऊ लागले. आपण सर्वांच्या अंतर्यामी आहोत हे त्यातून तुम्ही दाखवून दिलेत. ह्याच देहात श्रीकृष्णनाथांनी गायवासरे होऊन ब्रह्मदेवाला लाजवले आणि त्याचे गर्वहरण केले. ह्याच अवतारात श्रीकृष्णांनी यमलोकी जाऊन यमदेवाला सरळ करून गुरुपुत्राला काळाच्या कराल दाढेतून परतआणले.

उत्तरेच्या गर्भात तू असताना तुझ्यावर ब्राह्मास्त्राच्या महाशक्तीचा प्रयोग झाला होता. त्याला त्यांनी स्वत:च्या सुदर्शनचक्राने रोखून धरले अन्यथा तुझा जन्म होणे अशक्य होते. तुझे त्यांनी रक्षण केले कारण तुझ्या मातेने श्रीकृष्णांच्या चरणी शरणागती पत्करली होती. त्यांना जे शरण येतात त्या भक्तांचे संकट हरण करणे हे तर त्यांचे ब्रीद आहे. भक्तांच्या आर्त विनवणीला प्रतिसाद देऊन, त्यांच्याविषयी कळवळा येऊन ते त्याच्या सहाय्याला धावले नाहीत असे कधीच होत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article