For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाट्याला येईल तसं आयुष्य न कुरकुरता जगणे हे योग्याचे प्रमुख लक्षण आहे

06:37 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाट्याला येईल तसं आयुष्य न कुरकुरता जगणे हे योग्याचे प्रमुख लक्षण आहे
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

भगवंत म्हणाले, ज्यांना विषयातून मिळणारे सुख भोगायची उत्सुकता असते त्यांना नेहमीच दु:ख प्राप्त होते. जे आत्मस्वरूप जाणत नाहीत त्यांच्याकडून विषयांचे सेवन होते. पुवाच्या चिखलातील किड्यांना पुवाची किळस वाटत नाही कारण त्यांना त्यातच सुख मिळत असते त्याप्रमाणे आत्मस्वरूप माहित नसलेले विषयरूपी चिखलातील बेडूक बनतात आणि विषयांच्या अधीन होऊन राहण्यातच धन्यता मानतात. पण ज्ञानी पुरुषांना विषय हे दु:खदायक असल्याची खात्री असल्याने ते विषयांच्या नादाला लागत नाहीत. विषयांच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते म्हणजे दु:खाने सुखाचा घेतलेला वेश असतो. मात्र ज्यांना आत्मस्वरूपाचा विसर पडलेला असतो त्यांचे विषयसेवन केल्याशिवाय चालतच नाही. असे वाटते की, ह्या सगळ्यांना आत्मसुखाचा परिचय झाला तर किती बरे होईल पण ते ज्यांच्या हाताला लागलेले आहे त्यांनी त्यासाठी किती कष्ट उपसलेले असतात ते त्यांचे त्यांनाच माहित असते. अध्यात्माची गोडी लागली की, हळूहळू त्यात मुंगीच्या गतीने प्रगती होत राहते. प्रगतीच्या प्रमाणात विषयाबद्दल गोडी वाटणे कमी होते. ह्यात कित्येक जन्म कामी येतात. हे सर्व टाळून जर आत्मसुख सहजी प्राप्त होऊ लागलं तर प्रारब्धानुसार भोगावया लागणाऱ्या दु:खदायक योनी निरर्थक होणार नाहीत काय? अथवा गर्भात राहण्याचे संकट किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट कोणी सोसायचे? जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना रहायला जागा कशी मिळणार? आणि या जगामध्ये संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही का?

अर्जुना, यामुळेच विचार करून पाहिले तर लक्षात येईल की, विषय वाईट आहेत. मी सांगतोय त्याचा विसर पडल्याने तू चुकून कधी त्या मार्गाला गेलास तर पुढे मात्र जाऊ नकोस. विरक्त पुरुष विषयातून सुख मिळते ह्या कल्पनेशी कधीही सहमत होत नसल्याने ते विषय हे विष मानतात आणि त्यांचा त्याग करतात पण विषयांचा त्याग करणे एव्हढे सहजी शक्य होत नाही. कारण माणसाला होणाऱ्या इच्छा आणि त्या पुऱ्या होत नाहीत हे लक्षात आल्याने येणारा राग ह्यांची ताकद अतिशय जबरदस्त असते. त्यावर मात करण्यासाठी जसं आयुष्य वाट्याला येईल तसं जगण्याची सवय करून घेणं फार महत्त्वाचं आहे पण मनुष्य तर मी म्हणीन तसंच झालं पाहिजे म्हणून हट्टाला पेटलेला असतो.

Advertisement

एखाद्या प्रसंगी तो शहाण्यासारखे वागून वाट्याला आलेली परिस्थिती स्वीकारतो परंतु दरवेळी त्याला ते जमतेच असे नाही. हा अनुभव सगळेच नेहमी घेत असतो. ज्यांना आत्मज्ञान झालंय त्यांना मात्र वाट्याला येईल तसं आयुष्य जगणं नेहमी शक्य होतं कारण ह्या जगाला एकतर ते मिथ्या समजतात किंवा भगवंताची लीला म्हणजे खेळ मानतात. खेळात हारजीत ही चालायचीच म्हणून ते हा प्रकार गांभीर्याने घेत नाहीत.

वाट्याला येईल तसं आयुष्य न कुरकुरता जगायचं हे आत्मज्ञानी व्यक्तीचे प्रमुख लक्षण आहे. म्हणून पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, जो काम व क्रोध यांचा हल्ला सहन करू शकतो तो योगसाधनेने भगवंताशी एकरूप झालेला असल्याने सुखी असतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.