राक्षसाला शोधण्यासाठी...
भुते, राक्षस आदींच्या अस्तित्वांसंबंधी प्रत्येकालाच एक आकर्षण वाटत आलेले आहे. असे काहीही नसते, हे विज्ञानाने सिद्ध करुनही त्यांवरचा अनेकांचा विश्वास कमी झालेला नसतो. केवळ भारतातच अशी स्थिती आहे, असे नाही. जगभरात सर्वत्र हा विश्वास आहे आणि भुते तसेच राक्षस यांना शोधण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसारख्या प्रगत देशांमध्येही प्रयत्न झालेले आहेत. अशाच एक प्रयत्नांची ही स्वारस्यपूर्ण कथा आहे. ब्रिटनमधील स्कॉटलंड येथे अनेक शतकांपासून एका राक्षसाची कहाणी सांगितली जाते. या राक्षसाला ‘नेसी’ असे नाव आहे. हा राक्षस एका सरोवरात राहतो, ज्याचे नाव नेस असे आहे. आजही ही कथा लोकप्रिय आहे. आता, खरोखरच असा राक्षस या सरोवरात आहे का, हे पाहण्यासाठी 1970 च्या दशकात संशोधकांनी एक प्रयोग केला होता. त्यांनी या सरोवरात सहा स्थानी पाण्यातली दृष्ये टिपू शकतील असे कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला.
पंचावन्न वर्षांपूर्वी, म्हणजे 1970 मध्ये हे कॅमेरे बसविले गेले. त्यांच्यापैकी 3 कॅमेरे या सरोवरात आलेल्या वादळामुळे हरविले गेले. तथापि, एक कॅमेरा सुस्थितीत बाहेर काढण्यात आला. हा त्या काळाच्या मानाने अत्याधुनिक कॅमेरा होता. या कॅमेऱ्याने घेतलेल्या छायाचित्रांची पाहणी करण्यात आली. तथापि, राक्षस काही या छायाचित्रांमध्ये दिसून आला नाही. तथापि, या सरोवराच्या तळाशी, अर्थात जवळपास 500 फूट खोलीवर पाणी अत्यंत गढूळ होते. या पाण्यात चिखल आणि गढूळपणामुळे वेगवेगळ्या आकृती निर्माण होत असत. त्याच राक्षसासारख्या भासत असत, असे या छायाचित्रांच्या अभ्यासावरुन आता दिसून आले आहे.