For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जमावापासून बचावासाठी तरुणाची कालव्यात उडी

06:24 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
जमावापासून बचावासाठी तरुणाची कालव्यात उडी
Advertisement

हिंदू युवकाचा मृत्यू : चोरीच्या संशयाने पाठलाग

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशच्या नौगाव जिह्यात कालव्यात आणखी एका हिंदू युवकाच्या मृत्यूची घटना बुधवारी उघड झाली. जमावापासून बचाव करण्यासाठी कालव्यात उडी मारल्यानंतर 25 वर्षीय हिंदू तरुणाचा मृत्यू झाला. मृताचे नाव मिथुन सरकार असे असून तो भंडारपूर गावचा रहिवासी आहे.

Advertisement

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांनी मिथुनवर चोरीचा आरोप करत त्याचा पाठलाग केला. पळून जाण्याच्या प्रयत्नात जवळच्या कालव्यात उडी मारल्यामुळे तो बुडाला होता. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले. सुमारे चार तासांनंतर दुपारी 4 वाजता कालव्यातून मिथुनचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासानंतर, मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मृताचा प्रत्यक्षात चोरीत सहभाग होता की नाही याची पोलिसांनी अद्याप पुष्टी केलेली नाही.

बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले सुरूच

गेल्या काही महिन्यांत बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. सोमवारी रात्री नरसिंगडी जिह्यात एका हिंदू दुकानदाराची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. मृताचे नाव 40 वर्षीय शरत चक्रवर्ती मणी असे आहे. गेल्या 18 दिवसांत हिंदू व्यक्तीची ही सहावी हत्या आहे. शरत चक्रवर्ती मणी हे पलाश उपजिह्यातील चारसिंदूर बाजारात त्यांचे किराणा दुकान चालवत असताना अचानक अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून तेथून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या मणी यांना रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 19 डिसेंबर रोजी मणी यांनी फेसबुकवर देशातील वाढत्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करत पोस्ट केली होती. या पोस्टमुळेच त्यांची हत्या झाल्याची चर्चा आहे.

Advertisement
Tags :

.