भक्ती गांवस - तावडे यांना जे. जे. टी. विद्यापीठाची पीएचडी
सावंतवाडी/ प्रतिनिधी
सौ. भक्ती प्रसाद गांवस - तावडे यांना जे. जे. टी. विद्यापीठ राजस्थान यांची डॉक्टर ऑफ फिलॉसफी ( पीएचडी ) पदवी प्राप्त झाली आहे. भक्ती गांवस यांनी श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबडेवाला विश्वविद्यालय विद्यानगरी, झुंझुनू राजस्थान येथे लायब्ररी ऑफ सायन्स या विषयात " बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड ( तृतीय ) का पुस्तकालय मे विशेष योगदान " हा हिंदी प्रबंध सादर केला होता. या प्रबंधामध्ये बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात शिक्षण व ज्ञान प्रसारण याकरिता ग्रंथालयाचे जाळे सक्षमपणे उभे करून प्रजाभिमुख राजकारभार केला. महाराजांच्या या कार्याचे त्या काळात जगभर कौतुक झाले. महाराजांच्या या सर्व कार्याचा आढावा या प्रबंधामध्ये चिकित्सकपणे सौ. गांवस यांनी घेतला आहे. या प्रबंधाला मान्यता देऊन विद्यापीठाने भक्ती गांवस हिला डॉक्टर ऑफ फिलोसफी पदवी प्रदान केली. या प्रबंधासाठी तिला प्रो. अमजत अली व डॉ. जी. ए. बुवा यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रबंधासाठी ज्येष्ठ साहित्यिक श्री. बाबा भांड व डॉ. रमेश वरखेडे, गोवा सेंट्रल लायब्ररीचे माजी क्यूरेटर डॉ. सुशांत तांडेल यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे सौ. भक्ती गांवस यांनी सांगितले.