आत्मस्वरूपमय होण्यासाठी मन पूर्णत: निर्विचार व्हावे लागते
अध्याय पाचवा
कर्मयोगाचे आचरण करणे सुलभ जाण्यासाठी भगवंतांनी आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कर असे अर्जुनाला सांगितले. सांख्य व कर्मयोग ह्याबद्दल माहिती नसलेले लोक त्यांना वेगवेगळे समजतात. जे जाणकार आहेत त्यांना माहित असतं की, यापैकी एकाचे जरी अनुष्ठान केले तरी मोक्ष प्राप्त होतो. कर्मयोग अंगात भिनल्याशिवाय मनुष्य कर्मसंन्यासी होऊ शकत नाही, असे भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात,
योगावांचूनि संन्यास कधी साधे चि ना सुखे । संयमी योग जोडूनि ब्रम्ह शीघ्र चि गाठतो ।।6 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, कर्मयोगावाचून कर्मसंन्यासाची प्राप्ती होणे दुष्कर आहे. फलनिरपेक्ष कर्मयोग ज्याच्या पचनी पडलेला आहे अशा मुनीला कर्मसंन्यास साधतो आणि त्यातूनच त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. समजा डोंगरावर चढून जायचे आहे तर त्यासाठी डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याने पायथा गाठावा लागतो तसे मोक्षरुपी पर्वत चढून जाण्यासाठी निष्काम कर्म करण्याच्या रस्त्याने मोक्षरुपी पर्वताच्या पायथ्यापर्यंत जावे लागते. मोक्षरुपी पर्वताच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत साधक कर्मयोगाच्या आचरणात निष्णात होतो. त्यामुळे तो मोक्षरूपी पर्वतावर सहजी चढू शकतो. त्यामुळे त्याला परमानंदरूप शिखर लगेच सर करता येते परंतु ज्याचे हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही, त्याला संन्यासाची प्राप्ती कधीच होत नाही.
ज्याला निरपेक्षतेने कर्म करायचे आहे हे लक्षात ठेवावे लागत नाही तो कर्मयोगात निष्णात झालेला आहे असे म्हणता येईल. त्याचा मुळचा स्वभाव संपूर्ण बदलून तो सहजगत्या निष्काम कर्मयोग आचरत असतो. त्याच्या अंगी कोणते गुण असतात ते भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणाले, ज्याला निष्काम कर्मयोग आत्मसात झालेला आहे किंवा जो कर्मयोगाच्या आचरणात निष्णात झालेला आहे असा साधक शुद्धचित्त, जितदेह, जितेंद्रिय असतो. त्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्म्याशी एकरूप झालेला असतो. असा मनुष्य कर्म करीत असला तरी त्यापासून अलिप्त असतो.
अंतरी धुतला योगी जिंकूनि मन इंद्रिये । झाला जीव चि भूतांचा करूनि हि अलिप्त तो ।। 7 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जो मी कर्ता आहे ह्या भ्रमातून मुक्त झालेला असतो त्याने आपले मन गुरूपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपाशी एकरूप केलेले असते. समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते दिसत असते पण ज्यावेळी ते समुद्रात मिसळते, त्यावेळी ते समुद्राएव्हढे होते त्याप्रमाणे आत्मस्वरुपात मुरलेला योगी आत्मस्वरूपमय होतो. आत्मस्वरूपमय होण्यासाठी मन पूर्णत: निर्विचार व्हावे लागते. जेव्हा आपण एखादे भांडे पाण्याने भरायचे ठरवतो त्यावेळी त्यात इतर कोणतीही वस्तू नाही ह्याची खात्री करून घेतो त्याप्रमाणे साधक मनातले संकल्पविकल्प निघून गेलेले आहेत ह्याची खात्री करून घेतो. संकल्पविकल्प निघून जाण्यासाठी त्याने त्याचे मन आणि बुद्धी सद्गुरुना अर्पण केलेली असते. असे निर्विकार मन सद्गुरूंच्या उपदेशाने भरून गेल्याने आत्मस्वरूपमय झालेले असते. तो दिसताना इतर सामान्य माणसांसारखाच दिसत असला तरी त्याने आत्मस्वरुपाप्रमाणे तिन्ही लोक व्यापलेले असतात. त्याने काही कार्य जरी केले तरी ते त्याने केले असे होत नाही कारण त्याच्या शरीराचा ताबा आता आत्मस्वरूपाने घेतलेला असतो.
क्रमश: