For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगत्पित्याची व्हावया भेट, धरू संतांचे बोट

06:30 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
जगत्पित्याची व्हावया भेट  धरू संतांचे बोट
Advertisement

श्री रामायणामध्ये एक हृद्य प्रसंग आहे. अयोध्येत तापस वेष धारण केलेले तेजस्वी, लाघवी दोन बटू, महर्षी वाल्मिकींचे शिष्य अश्वमेध यज्ञ मंडपात आले आणि रामचरित्रगायन करू लागले. आपल्यासमोर आपल्या चरित्राचे गायन करणारे हे दोन बटू आपलेच पुत्र आहेत हे श्रीरामांना ठाऊक नव्हते. मंत्रमुग्ध करणारे ते गायन ऐकून प्रभुचे लोचन पाणावले. ग. दि. माडगूळकर गीतरामायणात म्हणतात-

Advertisement

‘सोडून आसन उठले राघव

उठुनी कवळिती अपुले शैशव

Advertisement

पुत्रभेटीचा घडे महोत्सव

परि तो उभयां नच माहिती

कुशलव रामायण गाती..’

-श्रीराम हे परमपिता आहेत, परंतु अवतारातील त्यांचे हे लौकिक पितारूप विलोभनीय आहे. श्री रामायणातील दुसरा एक प्रसंग आहे. राजा दशरथांनी जेव्हा पहिल्यांदा पाळण्यामधल्या आपल्या पुत्राकडे बघितले तेव्हा श्रीरामचंद्र ओळखल्यासारखे हसले. ते बघून राजा दशरथ आनंदाने वशिष्ठ ऋषींना म्हणाले, ‘बघा, मला बघून कसे ओळखीचे हसला!’ वशिष्ठांनी विचारले, ‘राजा, तू कोण आहेस म्हणून त्याने तुला ओळखले?’  राजा दशरथ म्हणाले, ‘मी त्याचा पिता आहे हे त्याला कळले म्हणून.’ तेव्हा वशिष्ठऋषी म्हणाले, ‘अरे, हा ईश्वर असून जगाचा पिता आहे. तुझाही तो पिता आहे. आपण याचे पिता आहोत हे तुझे अज्ञान बघून तो हसला.’

जगत्पित्याची विविध रूपे धार्मिक वाड्.मयात आढळतात. श्रीमद् भागवतामध्ये दोन कथा चिरंजीव आहेत. एक ध्रुव बाळाची आणि दुसरी भक्त प्रल्हादाची. या दोघांनाही परमेश्वराचा साक्षात्कार झाला तो पित्याने केलेल्या विरोधामुळेच. ध्रुव बाळ अतिशय गोड निरागस होता. त्याला वडिलांच्या मांडीवर बसायचे होते. त्याच्या पित्याला-उत्तानपाद राजालाही- त्याला आपल्या मांडीवर घ्यावेसे वाटले, परंतु तो आवडत्या पत्नीच्या आधीन असल्याने त्याने पुत्राला ढकलून दिले. दु:खाने विव्हळ झालेल्या ध्रुवाने आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानून ठरवले की जिवाचे खरे  पिता असलेल्या नारायणाच्याच मांडीवर बसायचे. ध्रुवाने कठोर तपश्चर्या करून नारायणाला प्रसन्न केले. भगवंताचा साक्षात्कार झालेला ध्रुव जेव्हा आपल्या राज्यात परत आला तेव्हा उत्तानपाद राजा धावतच त्याच्या दर्शनाला आला. राजाला पश्चाताप झाला. त्याला वाटले, पाच वर्षाच्या निरागस बाळाला आत्मसाक्षात्कार झाला आणि पत्नीच्या मोहात माझे अर्धे आयुष्य फुकट गेले. षडरिपूंच्या पाशातून ध्रुवाने आपल्या पित्याला मुक्त केले. भक्त प्रल्हाद हा आईच्या उदरात नारायण नाम घेतच जन्माला आला. जरी त्याचा जन्म राक्षसकुळात झाला तरी आईच्या गर्भात भगवंताचा नाम उच्चार करीत असतानाच त्याची स्थापना झाली म्हणून तो भक्त झाला. सतत परमेश्वराचे नामस्मरण करणारा पुत्र प्रल्हाद यांच्याशी पिता हिरण्यकश्यपुने शत्रुत्व पत्करले. कारण त्याचा शत्रू असलेल्या परमेश्वराचे तो सतत नामस्मरण करी. ते शत्रुत्व जेव्हा विकोपास गेले तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंहअवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. शुद्ध, कोमल अंत:करणाच्या प्रल्हादाने प्रसन्न झालेल्या श्री नरसिंहाला वर मागितला की माझ्या पित्याला दुर्गती प्राप्त होऊ नये. तेव्हा भगवंत म्हणाले, तुझ्या पित्याला सद्गती देण्याची शक्ती माझ्यात नाही. तुझ्या सत्कर्मांमुळेच त्याला सद्गती मिळेल. तुझ्यासारख्या भक्तामुळे आज तुझा पिता माझ्या मांडीवर बसू शकला. तुझ्या सदाचाराने तुझ्या पित्याचा उद्धार झाला. या दोन्ही कथांमध्ये जगत्पित्याचे वात्सल्य दिसते.

पित्याची माया ही मुकी असते. ती व्यक्त होतेच असे नाही. संततीला चांगले वळण लागावे म्हणून प्रसंगी पिता कठोर होतो. जात्यावरची एक ओवी अशी आहे-

‘आई तू मुका घेशी, बाबा का बोलताती

पुत्र होवो वाचस्पती, म्हणूनिया?

आई तू मायेची, बाबा का कठोर?

लेकाने व्हावे थोर,  म्हणूनिया?’

-संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राची माऊली, तर संत तुकाराम हे महाराष्ट्राचे पिता आहेत. पोटातील वत्सल भाव ओठांपर्यंत येताना त्याचे कठोर शब्दात रूपांतर झाले आहे. जिवाच्या उद्धाराच्या कळकळीने संत तुकाराम महाराज कठोर बोलतात. ते म्हणतात-

‘जग जरी आम्हा देव ।परि हे निंदीतो स्वभाव

येतो हिताचा कळवळा।पडती हाती म्हणोनी काळा’

-विष्णुमय जग हा आमचा धर्म असूनही जिवाच्या कळकळीसाठी, त्याच्या हितासाठी, त्यांना परमात्म स्वरूपाकडे वळवण्यासाठी, परमपित्याच्या भेटीसाठी संत तुकाराम महाराज कठोर बोलतात

जिवाचे अनेक जन्म होतात. प्रत्येक जन्मात त्याला माता-पिता असतात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात-

‘जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला

परी शेवटी काळमुखी निमाला

महाथोर ते मृत्युपंथेचि गेले

कितीयेक ते जन्मले आणि मेले’

-जिवाचे जसे बरेवाईट कर्म असेल त्याप्रमाणे जीव जन्माला येतो आणि अपरिहार्यपणे काळमुखात जातो. मृत्यू कोणालाही चुकला नाही. कर्मानुसार पुन्हा जन्म आहे. ऋणानुबंधानुसार जिवाला माता-पिता मिळतात. कर्म संपले की आयुष्याचा खेळ संपतो. याला काही अंतच नाही का याचे उत्तर असे आहे की जिवाचा खरा पिता त्याला कळला की तो आत्मस्वरूपाच्या जवळ जातो आणि त्या जगत्पित्याच्या स्वरूपात लीन होतो. संत जनाबाईंचा एक अभंग आहे-

‘विठू माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा?’

-पंढरीचा विठुराया हा सगळ्या संतांचा पिता आहे. लेकुरवाळा हा शब्द फारसा प्रचलित नाही. संत ही विठोबाची मुलेच आहेत. या लेकुरवाळ्या विठूच्या अंगाखांद्यावर ती खेळत आहेत. या जगत्पित्याजवळ सहज जाण्याचा जिवाचा मार्ग म्हणजे संतांनी निर्माण केलेल्या पाऊलवाटेवरून त्यांचेच बोट धरून विठोबाच्या जवळ जाणे आणि आपल्या खऱ्या पित्याच्या कुशीमध्ये निश्चिंत होणे हेच होय.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.