भारत-पाक यांच्यात जेतेपदाची लढत
आशिया चषक टी-20 स्पर्धा : पाकचा बांगलादेशवर 11 धावांनी विजय, शाहीन आफ्रिदी सामनावीर
वृत्तसंस्था/दुबई
आशिया चषक सुपर फोर फेरीतील सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 11 धावांनी विजय मिळवित अंतिम फेरीत स्थान मिळविले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या शाहीन शहा आफ्रिदीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. बांगलादेशने पाकला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर भेदक गोलंदाजी करून पाकला 20 षटकांत 8 बाद 135 धावांवर रोखले. पण पाकच्या शिस्तबद्ध गोलंदजीपुढे बांगलादेशच्या फलंदाजांनीही हाराकिरी केल्याने त्यांना 20 षटकांत 9 बाद 124 धावांपर्यंतच मजल मारता आल्याने त्यांना 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. शाहीन आफ्रिदीने फलंदाजीत 13 चेंडूत 19 धावा जमविल्या. त्यानंतर गोलंदाजीत 17 धावांत 3 बळी मिळविले. हॅरिस रौफने 33 धावांत 3 व सईम आयुबने 16 धावांत 2 बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
बांगलादेशच्या भेदक माऱ्यापुढे पाकची स्थिती 14 षटकांत 6 बाद 71 अशी झाली तेव्हा ते शंभरी गाठणार नाहीत, असे वाटले होते. पण बांगलादेशच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा लाभ घेत त्यांनी सव्वाशेपारची मजल मारली. मोहम्मद हॅरिसने 23 चेंडूत 31 व मोहम्मद नवाजने 15 चेंडूत 25 धावा फटकावल्याने त्यांना बऱ्यापैकी धावा जमविता आल्या. शेवटच्या आठ षटकांत पाकने 80 धावांची भर घातली. बांगलादेशच्या तस्किन अहमदने 28 धावांत 3, महेदी हसन व रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. बांगलादेशच्या डावात शमिम हुसेनने सर्वाधिक 30, सैफ हसनने 18, रिशाद हुसेनने नाबाद 16 धावा जमविल्या. रविवारी भारत व पाक यांच्यात अंतिम लढत होणार असून एकाच स्पर्धेत दोन संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. याआधीचे दोन्ही सामने भारताने जिंकले असल्याने मानसिकदृष्ट्या भारतीय संघच विजेता ठरणार, अशी जास्त शक्यता आहे.
संक्षिप्त धावफलक
पाक 20 षटकांत 9 बाद 135 : मोहम्मद हॅरिस 23 चेंडूत 31, मोहम्मद नवाझ 15 चेंडूत 25, सलमान आगा 23 चेंडूत 19, शाहीन आफ्रिदी 13 चेंडूत 19, अश्रफ नाबाद 14, फखर झमान 13, तस्किन अहमद 3-28, महेदी हसन 2-28, रिशाद हुसेन 2-18. बांगलोदश 20 षटकांत 9 बाद 124 : शमिम हुसेन 25 चेंडूत 30, सैफ हसन 18, नुरुल हसन व रिशाद हुसेन प्रत्येकी 16, महेदी हसन 11, शाहीन आफ्रिदी 3-17, हॅरिस रौफ 3-33, सईम आयुब 2-16, नवाझ 1-14.