टायटनने तिमाहीत कमावला 916 कोटीचा नफा
नवी दिल्ली
घड्याळसह दागिन्यांच्या क्षेत्रात कार्यरत टायटन कंपनीने आपल्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने 916 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षीच्या याचअवधीच्या तुलनेमध्ये पाहता ही वाढ 9 टक्के इतकी अधिक दिसून आली आहे. मागच्या वर्षी समान तिमाहीमध्ये 835 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला होता. आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 12 हजार 653 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न प्राप्त केले आहे. याप्रकारे उत्पन्नामध्ये 37 टक्के वाढ नोंदवली आहे. मागच्या वर्षी याच अवधीमध्ये 9224 कोटी रुपयांचे उत्पन्न कंपनीने प्राप्त केले होते.
ज्वेलरी व्यवसायाची चमक
कंपनीच्या ज्वेलरी व्यवसायाने 8575 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळवून दिले आहे. या व्यवसायाच्या उत्पन्नात 19 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीच्या सर्व प्रकारातील व्यवसायांनी मागच्या तिमाहीत चांगली प्रगती नोंदवली आहे. घड्याळे तसेच वेअरेबल उत्पादनांची मागणीदेखील मागच्या तिमाहीत वाढलेली आहे.